जग पुढे जाण्यामागे ज्ञानलालसा हे कारण आहे. पुढे जाणारे जग आपण फार कुतूहलाने पाहतो. त्यामागे मोठी ज्ञानलालसा असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. सातारा येथील श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमप्रसंगी कुबेर बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष सी. व्ही. दोशी, उपाध्यक्ष युवराज पवार, विश्वस्त समितीचे अध्यक्ष दिनकर शालगर आदी उपस्थित होते.
जागतिक पातळीवर भारत माहिती तंत्रज्ञानात पुढे आहे. तसेच आयटी इंजिनिअरही आपल्याकडे सर्वाधिक आहेत. तरीही आपण स्टीव्ह जॉब्जची अ‍ॅपल अथवा मार्क झुकेरबर्गसारखी फेसबुक देऊ शकत नाही. सर्व विकसित देशांनी तरुणांना अपयशाची संधी दिली आहे. त्यामुळेच त्या देशात पुढील दोनतीनशे वर्षांनंतरचे बघणारी पिढी निर्माण झाली. त्यांनी त्या त्या देशात प्रचंड मोठय़ा औद्योगिक व शैक्षणिक विश्वाची निर्मिती केली, असे सांगून कुबेर म्हणाले, यासाठी ज्ञानाधिष्ठित समाज असणे आवश्यक आहे. इतिहासातील मान्यता पावलेले अनेक लोक वाचनसंस्कृतीतून घडले. वर्तमानाशी सांगड घालून जगाची दिशा ओळखून इतिहास वास्तवाशी जुळवून घ्यायला हवा. त्यातून आपण भविष्याचा वेध घेत नाही म्हणून भविष्य घडविण्यात आपण कमी पडतो. वाचनालयामध्ये ज्ञानसंस्कृती पसरविण्याची ताकद आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे वाचनालये दुर्लक्षित आहेत, टीव्ही आणि इंटरनेटने वाचन कमी होत असून ही संस्कृती जोपासणारा मोठा वर्ग आहे.
स्नेहलता देशमुख म्हणाल्या, वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा वापर जीवनात करायला हवा. संवाद हे माणसाला जवळ आणण्याचे माध्यम आहे. ज्ञान आचरणात आणण्याचे काम प्रत्येकाकडून व्हायला हवे. ज्योत्स्ना कोलटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अरुण गोडबोले, सुभाषराव जोशी, रमणलाल शहा, बाळासाहेब  माजगावकर, श्रीधर साळुंखे, दिनकर झिंब्रे, युवराज पवार, डॉ. एम. व्ही. पारंगे, रवींद्र झोटिंग, शिरीष चिटणीस, मधुसूदन पत्की आदी उपस्थित होते.