निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंमल सुरू होताच महानगरपालिकेने दणक्यात त्याची कार्यवाही सुरू केली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी शहरातील तब्बल सुमारे शंभर फलक, होर्डिग्जसह ४० अतिक्रमणेही हटवली. उद्याही ही मोहीम सुरू राहणार आहे.
अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मनपा निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. आज सकाळी लगेचच कारवाई सुरू करण्यात आली. राजकीय व्यक्ती व पक्षांचे राजकीय प्रचारकी थाटाचे होर्डिग्ज, फलक, फ्लेक्स आज हटवण्यात आले. त्यात सुमारे १८ मोठे फलक व ८० छोटय़ा फलकांचा समावेश आहे. उत्तरेकडून नागापूर औद्योगिक वसाहतीपासून थेट वाडिया पार्क चौकापर्यंतच आज ही कारवाई करण्यात आली. प्रामुख्याने सावेडी उपनगरात पूर्णपणे ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान दिवाळीचे निमित्त साधून काहींनी केलेली व्यावसायिक स्वरूपाची ४० अतिक्रमणेही या कारवाईत हटवण्यात आली.
उद्या (शुक्रवार) शहराचा मध्यवर्ती भाग आणि थेट केडगाव उपनगरापर्यंत ही कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम सुरूच राहणार असून मनपाने हटवल्यानंतरही कोणी पुन्हा हे फलक लावल्यास त्यांच्यावर आचारसंहिता भंग व सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती इथापे यांनी दिली.