कोल्हापूर ते सांगली या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारक व प्रवाशांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तर रस्त्याचे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्यावरील खर्च वाया जात आहे, असा मुद्दा उपस्थित करीत गुरुवारी शिवसेनेच्या वतीने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांना घेराओ घालण्यात आला. या मागणीसाठी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.    
कोल्हापूर ते सांगली चौपदरीकरण रस्ता मंजूर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने, शिरोली ते जयसिंगपूर या मार्गावर रास्ता रोको, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण, अधिकाऱ्यांना बांगडय़ांचा आहेर, कार्यालयास टाळे ठोको आंदोलन, शासनकर्ते व अधिकाऱ्यांचा पुतळा दहन, श्राध्द घालणे अशी शिवसेना स्टाईलची आंदोलने झाली. त्यानंतर रस्ता कामाला मंजुरी देऊन सुरुवात करण्यात आली.
चौपदरीकरणाचे काम सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनी, मुंबई यांच्याकडे आहे. रस्ता कामाचा भराव टाकताना मुरूम टाकण्याऐवजी काळी माती टाकली जात आहे. ही माहिती कळाल्यानंतर शिवसैनिकांनी हा प्रकार रंगेहात उजेडात आणला होता. कर्मचाऱ्यांनी उध्दट उत्तरे दिल्याने त्यांना चोप देण्यात आला होता. रस्ताकामात काळ्या मातीचा वापर झाला तर वजनदार वाहनांमुळे रस्ता दबण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील आयआरबी कंपनीने केलेले काम जसे निकृष्ट दर्जाचे आहे तसेच चौपदरीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे होत चालले आहे, असा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने केली.     
कार्यकारी अभियंता वेदपाठक यांना निवेदन देऊन रस्ता कामाचा दर्जा कसा निकृष्ट प्रकारे आहे याची माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली. वेदपाठक यांनी अशा प्रकारचे काम थांबविण्यात येईल आणि दर्जेदार काम केले जाईल, असे आश्वासन दिले. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, वैभव उगळे, साताप्पा भवान, सतीश मलमे, बाजीराव पाटील, आनंदा शेट्टी, सुरज भोसले, धनाजी मोरे, धोंडिराम कोरवी, पिंटू मुरूमकर, सचिन खोंद्रे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.