प्रक्रिया उद्योग बंद करण्याचा प्रसंग
जिल्ह्यातील सिन्नर, माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीत २६ एप्रिलपासून पूर्वसूचित न करता पाणी पुरवठा अचानक बंद करण्यात आल्याने उत्पादन ठप्प झाले आहे. तसेच कामगारांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने मोठय़ा व लहान उद्योगांवर पाण्या अभावी उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने रविवारपासून दोन टँकरव्दारे माळेगाव औद्योगिक वसाहतीत पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर व कार्यकारी अभियंता एस. आर. तुपे यांची निमा पदाधिकारी तसेच सिन्नरचे उद्योजक व व्यवस्थापनातील अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रातील पाण्याअभावी दुष्काळजन्य परिस्थितीची सर्वाना जाणीव असताना शुक्रवारपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक सिन्नर माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे उद्योगातील अधिकारी व कामगारांनाही पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल झाल्याने अनेक उद्योगांना तात्पुरता उद्योग बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही उद्योगांना खासगी टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागले. प्रक्रिया उद्योगांना पाण्याअभावी उद्योग बंद ठेवणे अनिवार्य झाले आहे. अति उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांना थंड करण्यासाठी देखील पाण्याचा वापर होतो. अशा परिस्थितीत काही कारणास्तव आग लागल्यास ती अटोक्यात आणण्यासाठी देखील सिन्नरला पाण्याची उपलब्धता नाही, अशी स्थिती आहे. कार्यकारी अभियंता तुपे यांनी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अडचण झाली होती. मात्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून काही तातडीचे निर्णयदेखील घेण्यात आले असल्याची माहिती दिली. दारणा नदीतून सोडण्यात आलेले पाणी चेहेडी बंधाऱ्यात पोहोचल्यावर दोन्ही औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा पूर्वसत्थितीत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, प्रकाश प्रधान, व्हिनस वाणी, मिलींद राजपूत, मंगेश काठे आदी उपस्थित होते.
चेहेडी पंपिंग केंद्राजवळ नदीतील पाणीसाठा संपल्याने सिन्नर माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. पाण्यावर आधारित उत्पादन असलेले उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली असून त्वरित कार्यवाही न झाल्यास हे उद्योग बंद होतील. पाण्याची मोठय़ा प्रमाणात अचानक अडचण निर्माण झाल्यामुळे उद्योजकांनी निमाकडे धाव घेतली. यावेळी निमा पाधिकाऱयंनी तातडीने निर्णय घेऊन रविवारी टँकरव्दारे माळेगाव औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा निमातर्फे उपलब्ध करून दिला. औद्योगिक वसाहतीत बोअर करण्याची परवानगी देणारा निर्णय झालेला आहे. या निर्णयाची त्वरित अमलबजावणी झाल्यास उद्योगांमध्ये नियमित वापरासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन उद्योग सुरू राहण्यास मदत होईल असे बेळे यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता तुपे यांनी त्वरित परवानगी देण्याचे आश्वासन दिले.