२६ वर्षांची प्रेमकहाणी, २४ वर्षांचा संसार, दोन मुले, पतीच्या धाडसी राजकीय प्रवासात खंबीर पाठिंबा आणि साथ, त्याच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि आता पतीचा उरलेला लढा हाती घेण्याची तयारी… युलिया नवाल्नाया यांचा जीवनप्रवास आतापर्यंत, विशेषतः १९९८मध्ये अ‍ॅलेक्सी नवाल्नींची भेट झाल्यानंतर, सोपा नव्हताच. आता तो अधिक खडतर होत जाईल, युलिया नवाल्नाया असण्याचे आव्हान खरोखर कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी रशियाची राजधानी मॉस्कोमधील सोलोव्हेत्स्की स्टोन येथे अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या ३६ वर्षीय व्लादिमिर निकितिन यांनी सांगितले की, “नवाल्नी यांचा मृत्यू अतिशय भयंकर आहे, आमच्या आशांचा चक्काचूर झाला आहे. नवाल्नी त्यांच्या कामाबद्दल अतिशय गंभीर होते, ते शूर होते आणि ते आता आपल्यात नाहीत. ते खरे बोलत होते, आणि ती फार धोकादायक गोष्ट होती कारण काही लोकांना सत्य आवडत नाही”.

कठोर राजवटीखाली दबलेल्या जनतेसाठी आवाज उठवणारा, लढा देणारा नेता किती महत्त्वाचा असू शकतो हे निकितिन यांच्या शोकसंतप्त प्रतिक्रियेतून दिसून येतं. अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यासारख्या धाडसी नेत्याचा अकाली मृत्यू सर्वसामान्य जनतेच्या मनातील आशा संपवण्याइतका परिणामकारक असू शकतो. अशा वेळी ही आशा संपुष्टात येऊ न देण्यासाठी इतरांनी पुढाकार घ्यावा लागतो. रशियात तो अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांची पत्नी युलिया नवाल्नाया यांनी घेतला आहे.

हेही वाचा : UPSC: लेक असावी तर अशी! वडील रस्त्यावर पकोडे विकायचे, लेकीनं यूपीएससीत मारली बाजी

युलिया याही नवाल्नींच्या मृत्यूमुळे हादरल्या आहेत. माझ्या मनाचे, हृदयाचे तुकडे झाले आहेत असे त्या म्युनिकमधून रशियन जनतेशी संवाद साधताना म्हणाल्या. मात्र, घाबरून माघार न घेता अ‍ॅलेक्सी यांचा लढा पुढे सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. नवाल्नी यांच्या स्वप्नातील, भविष्यातील सुंदर रशियाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचा आहे. त्यासाठी अ‍ॅलेक्सींचे समर्थक, सहकारी आणि इतरांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या पतीच्या मृत्यूसाठी त्यांनी पुतिन यांना जबाबदार ठरवले आहे आणि त्यांना व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना शिक्षा देणारच असा निर्धारही केला आहे.

युलिया नवाल्नाया या सक्रिय राजकारणात नव्हत्या. मात्र, त्या सतत अ‍ॅलेक्सींच्या सोबत होत्या. राजकीय निदर्शने असोत किंवा न्यायालयात सुनावण्या, त्या अ‍ॅलेक्सींचा हातात हात घेऊन त्यांच्या बरोबर उभ्या असत. ऑगस्ट २०२०मध्ये अ‍ॅलेक्सी यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यानंतर ते ओम्स्क रुग्णालयात कोमामध्ये होते. तेथील डॉक्टर त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना तसेच सोडून देण्यास उत्सुक दिसत होते. त्यावेळी युलिया यांनी हार मारली नाही. त्या कॅमेरा बरोबर घेऊन ओम्स्क रुग्णालयात गेल्या आणि डॉक्टर व पुतिन यांच्यावर दबाव टाकला. अखेर नवाल्नी यांची तेथून सुटका झाली आणि त्यांची रवानगी जर्मनीला करण्यात आली. बर्लिनच्या चॅरिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून ते बरे झाले आणि रशियात परतले. या संपूर्ण काळात युलिया पतीबरोबरच होत्या.

नवाल्नी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशनच्या सहकारी किरा यार्मेश सांगतात की, “युलिया यांनी ओम्स्कमध्ये दोन दिवस भांडून अ‍ॅलेक्सी यांना उपचारासाठी बाहेर काढले. त्या अतिशय शूर आहेत आणि त्यांच्यामुळेच अ‍ॅलेक्सी वाचू शकले”. युलिया यांनी सार्वजनिक जीवनाचा मोह धरला नाही, पण मागे राहून अ‍ॅलेक्सी यांना आणि त्यांच्या राजकीय चळवळीला खंबीर पाठिंबा दिला. राजकारण किती धोकादायक आणि कठीण आहे याची त्यांना जाण होती. आपण राजकारणात नसलो तरी अ‍ॅलेक्सींना पाठिंबा देताना करत असलेले काम राजकीय स्वरूपाचेच आहे असे त्या नवाल्नी यांच्या सहकाऱ्यांना सांगत असत. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये त्यांना सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

हेही वाचा : डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

युलिया यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर त्यांचा जन्म १९७६ साली झाला, त्यांचे आईवडील उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित होते. नवाल्नाया यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्या बँकेत नोकरी करत होत्या. १९९८मध्ये तुर्कस्तानला सुट्टीसाठी गेल्या असता त्यांची अ‍ॅलेक्सी यांच्याबरोबर भेट झाली, भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी अ‍ॅलेक्सी वकिली व्यवसायात नाव कमावण्यासाठी धडपड करत होते. दोन वर्षांनी दोघांनी विवाह केला. पुढे दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी नवाल्नाया यांनी नोकरी सोडली. मी एखाद्या होतकरू वकिलाशी किंवा विरोधी पक्षनेत्याशी विवाह केला नव्हता तर अ‍ॅलेक्सी नावाच्या तरुणाशी विवाह केला होता असे पुढे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. नवाल्नी यांचे व्यावसायिक जीवनाबरोबरच सार्वजनिक जीवनही सुरू झाले. आधी भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ता म्हणून आणि नंतर विरोधी पक्षातील राजकारणी म्हणून त्यांनी धाडसाने पुढे पावले टाकायला सुरुवात केली. २०१३ साली त्यांनी मॉस्कोच्या महापौरपदासाठी आणि २०१८ साली अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पण तेथील निवडणूक आयोगाने त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवले. प्रत्येक वेळी युलिया त्यांच्यासोबत होती. याच काळात नवाल्नी यांच्यावर विविध आरोप ठेवून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू झाले. त्या वेळी न्यायालयांमधील सुनावणीसाठी आणि देशभरात निदर्शने, मोहिमांसाठी त्या नवाल्नी यांच्याबरोबर फिरत असत.

हेही वाचा : पतीने पत्नीला सार्वजनिक ठिकाणी कानाखाली मारणे हा विनयभंग आहे का? जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

१४ फेब्रुवारीला नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवर युलिया यांच्यासोबत फोटो पोस्ट केला होता. “तू प्रत्येक सेकंदाला माझ्या सोबत असतेस असे मला वाटते आणि मी तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करतो”, असा संदेश त्याबरोबर लिहिला होता. यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. याच प्रेम आणि विश्वासाच्या बळावर युलिया आता नवाल्नी यांना अर्धवट सोडाव्या लागलेल्या मार्गावरून वाटचाल करायची आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenges before russian opposition leader alexei navalny s wife yulia navalnaya css
Show comments