Premium

नातेसंबंध- डेटिंगला जाताना…

जोडीदाराची लग्नाआधीच नीट माहिती होणं पुढच्या सुखकर आयुष्यासाठी उपयोगी असतं. आजकाल डेटिंगचा उपयोग एकमेकांना जाणून घ्यायला करता येऊ शकतो. मात्र त्यासाठीही तयारी हवी.

dating, a new type of relationship
डेटिंगला जाताना… (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अपर्णा देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हाय गर्ल्स! मी आहे तुमची सर्वांची लाडकी आर.जे. ढिंच्याक ! आणि तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे, ‘चिल मार!’

मुलींनो, आता तीनच महिन्यांत येणार आहे लग्नाचा सीझन. म्हणजे त्या वेळेला लग्नाचे मुहूर्त असतात. वातावरणही अगदी रोमँटिक असतं आणि डिसेंबर जानेवारीच्या थंडीत हनिमून प्लॅन करण्याची गंमत काही औरच असते. तेव्हा लग्न करण्यासाठी तुम्ही कुणाला ‘डेट’ करत असाल तर आजचा आपला ‘चिल मार’चा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे बरं का! आज आपण सगळ्यांत आधी गप्पा मारणार आहोत श्रावणीशी, जिने नुकताच दोन जणांसोबत वेगवेगळ्या डेटिंगचा अनुभव घेतलेला आहे. हाय श्रावणी, तू कुणासोबत डेटिंगसाठी गेली होतीस आणि तो अनुभव कसा होता? ते जरा आपल्या मैत्रिणींना सांगशील?”

“सगळ्यांना हॅलो! मी एका आय.टी. कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाबरोबर डेटिंगला गेले होते. माझा तो अनुभव चांगला नव्हता. एक तर त्या मुलाने तीन वेळा ठिकाण आणि वेळ बदलली. इथे आपण काय रिकामे बसलो आहोत का? तो वाटेल तेव्हा वाट्टेल तिथे वेळा बदलून बोलवत राहील? तिथेच माझं डोकं सटकलं; पण आईनं बजावून सांगितलं होतं, की छोट्या छोट्या कारणांवरून लगेच मत बनवायचं नाही म्हणून मुकाट गेले. त्याच्या बोलण्यात जराही अदब नव्हती. वेटरशी बोलताना, माझ्याशी बोलताना तो कुण्या प्रांताचा राजा असल्यासारखा बोलत होता. मला न विचारता सिगरेट काय पेटवली, मला न विचारता त्याला हवा तो पदार्थ ऑर्डरसुद्धा केला. माझं नाव, कंपनी आणि पगार सगळं ‘म्यॅट्रिमोनी’वर असतानाही मला खोदून खोदून पगार विचारला. लग्नानंतर आईला पैसे देणार तर नाही ना, असंही विचारलं. निर्लज्ज कुठला! पहिल्या भेटीतच जो मुलगा असा वागतो त्याच्याशी मी आयुष्य जोडण्याचा विचार तरी करेन का? माहीत नाही कोणता ॲटिट्यूडने तो असं वागत होता.”

“ पण तूही त्याला काही प्रश्न विचारले असतील ना?”

“हो, त्याची आवडनिवड, आईवडील काय करतात, लहान बहीण आहे, तिच्याबद्दल विचारलं; पण त्यानं मला माझ्या आवडीनिवडीबद्दल काहीही विचारलं नाही. हा, सेक्सलाइफबद्दल माझं मत विचारलं. मी न लाजता माझी मतं सांगितली तर म्हणाला, त्या विषयात तो एकदम एक्स्पर्ट आहे. मी उडालेच आणि वर म्हणाला, की लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याच्या पगारातला एक रुपयासुद्धा मागायचा नाही. तिचा पगार असेल, तो तिनं घरात वापरावा. मी सरळ पर्स उचलली आणि उठले. त्याला म्हटलं, तू तुझ्या मताने खाण्याची ऑर्डर दिली आहेस. ते खाऊन तू घरी जा. मला इथे एक मिनिटही थांबायचं नाही आणि निघून आले.”

“कमाल आहे! टीम लीडर म्हणून काम करणारा मुलगा पहिल्याच भेटीत असा कसा वागू शकतो?”

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: स्वागत आरोग्यदायी जीवनाचे

“तुला सांगू का, उलट तो असा वागला हे माझ्यासाठी उत्तम झालं. कारण तो खराखुरा कसा आहे याचा मला अंदाज आला. काही मुलं लग्नाआधी अत्यंत सभ्य, शालीन वागतात आणि लग्न झाल्यावर पूर्णपणे वेगळे वागतात. त्यापेक्षा हे परवडलं… मी वेळीच सावध झाले.”

“बरं, तुझा दुसरा अनुभव कसा होता?”

“तो मुलगा अतिशय नम्र होता. वागणं-बोलणं खूपच सभ्य आणि शांत होतं.”

“मग जमली का जोडी?”

“कुठचं काय! पूर्ण दोन तासांत तो स्वतःहून चार वाक्यंही बोलला नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त हो, नाही, नको इतकंच देत होता. मूव्हीज आवडतात का? तर, नाही. फक्त ‘नाही’ म्हणाला. ऑफिसनंतरच्या वेळात काय करायला आवडतं, तर म्हणाला, ‘‘काही नाही, घरीच बसतो.’’ “मित्रमैत्रिणी नाहीत का?”, तर म्हणे नाही. अशा माणसाशी कसा संवाद साधायचा सांग. अशी मुलं नोकरी कशी करत असतील? त्यांच्यासोबत राहणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच की नाही? बाप रे …इतकं वय होईपर्यंत आईवडिलांना लक्षात नाही येत का, की आपला मुलगा असा कसा? म्हणजे तो अजिबात वाईट नाही वागला गं, पण अशा माणसासोबत अर्धा तास वेळ घालवणंदेखील किती कठीण आहे सांग. लग्न तर खूप दूरची बाब!”

“तुला जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा आहे नेमका?”

हेही वाचा… मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

“खूप श्रीमंत नसला तरी चालेल; पण आयुष्य जगण्याची कला त्याच्या जवळ असावी. खूप बडबडा नसला तरी चालेल; पण माझं मन जाणणारा, माझ्या मताचा आदर करणारा असावा. मला समजून घेणारा प्रेमळ व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवाय.”

“आहे का तुझ्या बघण्यात कुणी असा? सांग बाई असेल तर!”

“मैत्रिणींनो, तुम्हालादेखील तुमच्या डेटिंगचे अनुभव आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर नक्की आम्हाला कळवा आणि मुलांनो, डेटिंगला जाताना जरा घरातील महिला मंडळींशी बोलत जा, स्त्रीचं मन नेमकं काय म्हणतं याची थोडीशी कल्पना येईल तुम्हाला. पुन्हा भेटू या, आपल्या पुढील भागात, तोपर्यंत, चिल मार!”

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dating a new type of relationship dvr

First published on: 12-09-2023 at 13:40 IST
Next Story
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: स्वागत आरोग्यदायी जीवनाचे