देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगदेखील जनतेला मतदानाप्रती जागरुक करण्यासाठी विविध प्रकारे जाहिरात / प्रचार करत आहे. अशातच हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाची एक जाहिरात व्हायरल होत आहे. ती एवढ्यासाठी की हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाने मुस्कान नेगी या संगीत प्राध्यापिकेला सलग चौथ्यांदा राज्य निवडणूक आयोगाची युथ आयकॉन अर्थात ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे. हल्लीच त्यांना एका मराठी चित्रपटासाठी गाणं गाण्याची संधी मिळाली आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपलं स्वप्न साकार करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. त्यात काहीजण यशस्वी होतात, तर काहीजण मधेच हार मानून किंवा नशिबाला दोष देऊन मोकळे होतात. अशातच एखद्या व्यक्तीला काही शारीरिक अपंगत्व असेल तर त्यांना आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. रोज वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तरीही ते खचून न जाता जिद्दीने ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत असतात. मुस्कान नेगी यांना देखील अशाच काहीशा समस्यांना सामोरं जावं लागलं होतं, पण त्यांनी न खचता स्वत:चे प्रयत्न चालू ठेवले व स्वप्न सत्यात उतरवलं.

हेही वाचा : नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

मुस्कान या सर्वसाधारण घरातील मुलगी. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यामधील सिंदसली गावातील एका शेतकरी कुटुंबातील. घरची परिस्थिती तशी बेताचीच. जन्मत:च दृष्टीहीन असल्याने आईवडिलांनी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. एकीकडे मुलींना आजही अमूक गोष्ट करू नको, तमूक गोष्ट करू नको अशी बंधनं घातली जातात. मात्र मुस्कान यांच्या आईवडिलांनी नेहमीच मुस्कानला तिच्या आवडत्या गोष्टी करण्यात सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला. तसंच गावातील इतर मुलामुलींनी, शेजाऱ्यांनी देखील कधी तिच्यासोबत भेदभाव केला नाही. त्यांनी देखील तिला तिच्या प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं. त्यांनी कधीच तिला तिच्या अंधत्वाची जाणीव करून दिली नाही, असं मुस्कान सांगतात. तरीही मुस्कान यांना वैयक्तिक जीवनात मात्र संघर्ष करावाच लागला.

दृष्टीहीन असल्याने शाळेत प्रवेश घेताना सुरुवातीला शिक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. नंतर शाळेत प्रवेश मिळाला, पण पुढे होस्टेलमध्ये प्रवेश न मिळणं तसंच अभ्यासासाठी त्यांना उपयुक्त अशी साधनं न मिळणं, मिळालंच तर वेळेवर उपलब्ध न होणं या अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांचं गाव शहरापासून लांब असल्यानं त्यांना ऑडिओ बुक मिळण्यातसुद्धा गैरसोय होत असे. कधीकधी त्यांना अभ्यास पूर्ण करण्यासाठी वर्गातील मित्रमैत्रीणंकडून मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून अभ्यास करावा लागे. कधी तर परीक्षेसाठी रायटर मिळणेसुद्धा मुश्कील होत असे. पण या अडचणींमधून जातानाही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

हेही वाचा : हत्तीच तिचे मित्र

मुस्कान यांना लहानपणपासूनच गाण्याची आवड होती. घरी किंवा शाळेत असताना त्या फावल्या वेळेत गाणं गुणगुणत बसत. तेव्हा त्यांच्या कुल्लू येथील शाळेत बेलेराम कोंडल नावाचे सर होते. त्यांनी एकदा तिचं गाणं ऐकलं व त्यांनीच पुढे गायन शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांनीच मुस्कान यांना एका संगीत ॲकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. गाणं शिकता शिकता त्यांचा गायकीमधला रस वाढला व तेव्हाच त्यांनी आपण संगीत/ गायक शिक्षक बनायचं असं ठरवलं. पण जसजशा त्या मोठ्या होत गेल्या तसं त्यांना कळलं की संगीत शिक्षकापेक्षासुद्धा अजून खूप काही करू शकतो. त्यांनी संगीत विषयामधूनच एम. ए. पूर्ण करून काॅलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून रूजू झाल्या. सध्या त्या संगीतात पीएच.डी करत आहेत.

त्यांच्या अथक परिश्रमामुळे ज्या राजकीय कन्या महाविद्यालय शिमला येथून एम.ए.ची डीग्री मिळवली, त्याच महाविद्यालयात त्या संगीताच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी नेट सेटची परीक्षा देखली त्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. प्राध्यापिका म्हणून कार्यरत असताना महाविद्यालयातील जर्नलिझमचे प्राध्यापक अजय श्रीवास्तव यांना एक दिवस निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांनी विचारपूस केली की त्यांना अशी एक व्यक्ती हवी आहे जिने स्वबळावर मेहनतीने काहीतरी वेगळं केलं आहे आणि यश संपादन केलं आहे. त्या व्यक्तीची स्व:ची अशी वेगळी ओळख असेल. ज्यांच्याकडून तरुणपिढीला काहीतरी प्रेरणा मिळेल. तेव्हा अजय श्रीवास्तव यांनी मुस्कान यांचा संघर्ष आणि कलात्मक गुण माहीत असल्यानं त्यांचं नाव सुचवलं. निवडणूक अधिकाऱ्यांना देखील मुस्कान यांची निवड योग्य वाटली व त्यांनी मुस्कान यांची हिमाचल प्रदेशची युथ आयकॉन / ब्रँड अँम्बेसडर म्हणून निवड केली.

हेही वाचा : अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार

युथ आयकॉन म्हणून निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या जाहिरातींमधून झळकल्यावर मुस्कान यांना विविध महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये जाऊन तरुणांना मतदानासाठी जागरूक करण्यासाठी, तसेच वैयक्तिक आयुष्यात यश संपादन करण्यासाठी प्रेरक वक्ता म्हणून मानानं बोलावलं जाऊ लागलं.

आज जे लाेक निवडणुकीला फार महत्त्व देत नाहीत किंवा मतदान करायला टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी मुस्कान यांचा एकच संदेश आहे की, एक भारतीय म्हणून मतदान हा आपला अधिकार आहे, कर्तव्य आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण आपण मतदान केल्यानं आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत होते आणि त्यातूनच आपण एक चांगले सरकार बनवू शकतो.

मुस्कान यांनी आपल्या सुमधूर आवामुळे आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये होणारा रफी नाईट्स, व्हॉईस ऑफ हिमालयाज अशा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर रेडिओ उडान (ऑनलाईन रेडिओ) आयोजित उडान आयडॉल २०१७-१८ च्या पहिल्या पर्वाच्या व गोल्डन शाईन ट्रस्ट द्वारे आयोजित गोल्डन व्हॉईस २०२१ या राष्ट्रीय स्पर्धांचे देखील विजेतेपद पटकावले आहे. असे एक ना अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच त्यांनी परदेश दौरेसुद्धा केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरीकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्निया या पाच राज्यांत त्यांनी स्टेज शो देखील केले आहेत. त्यांच्या आवाजाची गोडी इतकी आहे की हल्लीच त्यांना एका मराठी चित्रपटासाठीसुद्धा गाणं गाण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा : एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!

कौन कहता है कामयाबी

किस्मत तय करती है,

इरादों में दम हो तो

मंजिले भी झुका करती है।

मुस्कान नेगी यांच्याबाबतीत या ओळी चपखल बसतात. मुस्कान या स्वत: गायिका आहेत. त्यांच्या गोड सुमधूर आवाजाने श्रोत्यांना त्यांच्या आवाजाची भुरळ पडते. गायिका असण्यासोबतच त्या विविध वाद्य वाजविण्यात देखील निपुण आहेत. त्यांनी त्यांच्या आवाजाने फक्त हिमाचल प्रदेशच नाही तर जगभर नाव कमावलं आहे. आज हिमाचल प्रदेशमध्ये एखाद्या सेलिब्रेटीसारखी त्यांची क्रेझ आहे. आज त्या यशाच्या शिखरावर असल्या तरी त्यांचा इथवरचा प्रवास खडतर होताच. त्यांचा हा संघर्ष हिमाचल प्रदेशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. https://youtube.com/@muskannegi125?si=S3tdbqgTRxENtw8J या युट्यूब लिंकवर त्यांची गाणी ऐकू शकता.