सुचित्रा प्रभुणे
प्राणी आणि माणूस यांचे नाते म्हणजे ‘लव्ह ॲण्ड हेट’ प्रकारातले आहे. घरात साधे झुरळ किंवा पाल दिसली तर भयभीत होणारा माणूस आणि प्राणी पाळल्यानंतर आकंठ प्रेमात बुडालेला माणूस अशी टोकाची चित्रे आपण नेहमीच पाहत असतो, अनुभवत असतो. आता हेच पाहा ना,सिनेमात किंवा सर्कशीत आपण खुपदा हत्ती, घोडे पाहतो. तेव्हा हत्ती पाळण्याचा विचार तरी आपल्या मनात येतो का? नाही ना, पण पारबती (पार्वती) बरुआ याला अपवाद आहेत.

पारबतीची ओळख सांगायची झाली तर यंदाच्या वर्षी पद्श्री सन्मानाने पुरस्कृत केलेल्या पहिल्या भारतीय महिला माहूत आणि क्रियाशील प्राणी संवर्धन क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ती.

हेही वाचा… अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार

पारबती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आल्या बीबीसीचे पत्रकार मार्क शॅण्ड यांनी त्यांच्या कामांवर आधारित ‘हत्तींची राणी’ हा माहितीपट तयार केल्यानंतर. हे शीर्षक त्यांच्या कार्याला तंतोतंत लागू होय. हे हत्तीप्रेम त्यांच्यात कसे निर्माण झाले, याची कहाणी खूप रोचक आहे.

पारबतीचे वडील प्रकृतिशचंद्र हे आसाममधील गौरीपूर राजघराण्यातील शेवटचे सदस्य. ते एक उत्तम शिकारी होते आणि त्यांना हत्तीसंदर्भात विशेष ज्ञान होतं. त्यांच्याजवळ सुमारे ४० हून अधिक हत्ती होते. प्रकृतिशचंद्र यांना ९ मुले होती. पारबती या त्यापैकी एक.

आपलं कुटुंब, नोकर-चाकर या सर्वांना घेऊन बऱ्याचदा ते जंगलामध्ये सहलीला जात असत. या सहली दरम्यान ते आपल्या मुलांना हत्तींविषयी बऱ्याच गोष्टी समजावून सांगत. यातूनच पारबती यांनना हत्तींविषयी प्रेम निर्माण झालं आणि लवकरच त्यादेखील वडिलांप्रमाणे हत्तींना जाणून घेण्यात पारंगत झाली. इतकी की अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी पहिला जंगली हत्ती पकडला आणि यासाठी वडिलांनी तिचं विशेष कौतुकदेखील केलं.

तेव्हापासूनच हत्तींना पकडणं आणि त्यांना पाळीव प्राणी म्हणून तयार करणं हे तिच्या जीवनाचं ध्येय ठरून गेलं. पुढे १९७० च्या सुमारास कायद्यात बदल झाल्यामुळे राजेशाही घराण्याचा अंत झाला. परिणामी, आर्थिक सत्ता संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या वडिलाना उदरनिर्वाहासाठी हत्ती विकणं भाग होतं; परंतु पार्वती यांनी आपलं हत्तीप्रेम आयुष्यभर जोपासलं.

वयाच्या १४ व्या वर्षी जेव्हा त्यांनी आसाम येथील कोचुगाव जंगलातून हत्ती पकडला आणि त्याला पाळीव प्राणी म्हणून तयार केलं, तेव्हा त्यांना आसाम, प. बंगाल आणि आजूबाजूच्या गावातून हत्ती पकडण्यासाठी बोलावलं जाऊ लागलं.

हेही वाचा… एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!

ताब्यात घेतलेल्या हत्तींना कसं सांभाळायचं, त्यांच्यावर कोणते उपचार द्यायचे, त्यांचं संगोपन कसं करायचं याबाबतीत त्या वन अधिकाऱ्यांना माहिती देऊ लागल्या. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या ताफ्यात १४ हून अधिक जंगली हत्ती पाळीव झाले. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना १९८९ साली संयुक्त राष्ट्र पर्यावरण या जागतिक संघटनेतर्फे तिला ‘ग्लोबल ५०० – रोल ओंफ ऑनर’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आसाम सरकारतर्फे २००३मध्ये ‘आसामची मानद मुख्य हत्ती संरक्षक’ या पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

जसजसे त्यांचं काम लोकांच्या आणि पर्यायानं सरकारच्या नजरेत येऊ लागलं, तसतसे अनेक मानसन्मान त्यांना मिळू लागले. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली.

महिला माहूत म्हणून लोकप्रिय ठरत असतानाच अचानक त्यांच्या भोवती वादांचे वादळ उठू लागले. २००३ मध्ये ग्रीन ऑस्कर विनरचे फिल्म मेकर मिकी पांडे त्यांच्या कामावर लघुपट करण्यासाठी आले होते. त्यांच्या कामाचे पूर्ण शूट केल्यानंतर त्या हत्तींना कशाप्रकारे त्रास देतात, कशी त्यांची पिळवणूक करतात अशा पद्धतीनं त्या लघुपटाचा अपप्रचार करण्यात आला. त्यातच ज्या हत्तीवर हा लघुपट चित्रित केला होता, तो अवघ्या काही दिवसांत मृत्युमुखी पडला. आणि मग पेटा, मनेका गांधीसह अनेक प्राणी संघटना त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. परंतु पारबती काही डगमगल्या नाहीत. त्या आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या. माझे काम पाहण्याच्या निमित्ताने अनेक लोक भेटायला येतात. परंतु अपप्रचार करून स्वत:चाच व्यवसाय वाढवितात, असं त्यांचं म्हणणं होतं.

जंगली हत्तींना माणसाळणं हे वाटतं तितकं सहज सोपं काम नाही. भले माझ्या कामाची पद्धत पारंपरिक स्वरुपाची असेल, पण मी मात्र प्रत्येक हत्तींना माझ्या मुलाप्रमाणेच वागविते. त्यासाठी कधी कधी मला कठोर व्हावं लागतं. मी त्यांच्यावर तितकंच प्रेम करते, तितकीच त्यांची काळजी घेते. माझ्या एका हाकेवर दहा हत्ती सहज गोळा होतात, या गोष्टी जाणीवपूर्वक दाखविणं टाळलं जातं, असं आपलं मत तिनं एका मुलाखतीमध्ये मांडलं होतं. अर्थात, नंतर काही वर्षांनी मिकी पांडे यांनी त्यांची माफी मागितली. आपल्या लघुपटातून त्यांच्या कामाची योग्य ती दखल घेतली गेली नाही, हे कबूल केलं.

हेही वाचा… समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?

हत्तीसाठी माहूतगिरी करणं हा पारबतीसाठी नुसताच तिच्या व्यवसायाचा भाग नाही, तर तिचं ह्त्तीप्रेम तिच्या नसानसांत भिनलं आहे. यासंदर्भात एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो. प .बंगाल येथील मिदनापूर राज्यातील एका जंगलात ५० हत्तींचा कळप चालता चालता वाट चुकला. तेथील वन अधिकाऱ्यांनी सर्व तऱ्हचे प्रयत्न केले परंतु हत्ती काही परत येईनात.

तेव्हा या कामगिरीसाठी पारबतीला बोलविण्यात आलं. आपल्याकडील काही हत्ती आणि इतर महुतांची एक टीम तयार करून अत्यंत चिकाटीनं ५० च्या ५० ह्त्तींना आपल्या पूर्वीच्या जागेवर आणून, कोणत्याही प्रकारची हानी न करता जंगलात सोडलं. तिच्या या अवघड कामगिरीचं भरभरून कौतुक झालं.

हत्तीप्रेमाइतकी ती तिच्या पारंपरिक लोकनृत्यासाठी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. अशा या पारबतीनं लग्न केले आहे का, याबद्दल तिला अनेकदा विचारण्यात येतं. तेव्हा ती म्हणते की, हो एका योग्य वयात मीदेखील बँकेत काम करणाऱ्या एका दास नावाच्या माणसाबरोबर लग्न केलं होतं. परंतु माझे हत्ती आणि त्याचे सूर काही जुळले नाही; तेव्हा आम्ही स्वत;हूनच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. माझे हत्ती हेच माझे खरे मित्र आहेत. त्यांनीच मला जीवनावर भरभरून प्रेम करायला आणि प्रतिकूल परिस्थितीत लढायला शिकविलं, असं त्या सांगतात.