आपल्या पालकांचा शोध घेण्याची किंवा त्यांना ज्या अनाथाश्रमात सोडले गेले होते, त्याला कधीही भेट देण्याची इच्छा, लिसा स्थळेकर यांना झाली नाही. “मला कधीही प्रश्न पडला नाही किंवा कोणती उत्सुकतादेखील नव्हती. कारण- ज्या परिवारानं मला आपलंसं केलं, त्यांनी मला खूप चांगले संस्कार दिले आणि माझं अतिशय छान पालन-पोषण केलं,” असे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व कॉमेंट्रेटर लिसा स्थळेकर यांनी सिडनीवरून द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीही जेव्हा लिसा पुण्यात आल्या होत्या तेव्हा ससूनमधील श्रीवत्स अनाथाश्रमात येताच त्यांना भरून आल्यासारखे झाले होते. १३ ऑगस्ट १९७९ रोजी लिसा यांचा जन्म झाला आणि त्यांना याच श्रीवत्स अनाथाश्रमाच्या दाराशी सोडून देण्यात आले होते. “पुन्हा अनाथाश्रमाला भेट देण्याचा अनुभव मनाला भारावून टाकणारा होता,” असेदेखील त्यांनी सांगितले.

त्यानंतर त्या अजूनही या आश्रमाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, मागील वर्षी पुन्हा एकदा भेट घेण्यासाठी त्या परतल्या होत्या. “मला अजूनही आपल्या मूळ पालकांचा शोध घेण्याची गरज वाटत नसली तरीही आपण जिथे वाढलो आहोत, त्या जागेच्या संपर्कात राहणं छान वाटत असून, आता मी जे जीवन जगत आहे, त्याचे आभार मानते,” असे ४४ वर्षीय लिसा सांगतात. त्यांच्या जीवनाची सुरुवात अनाथाश्रमातून झाली असली तरीही आज त्या सर्व ऑलराउंडर्समध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरल्या असून, नशीब आणि स्वप्न तुम्हाला कुठेपासून कुठेपर्यंत घेऊन जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे.

“मला कधीही माझ्या सावत्र कुटुंबाचा त्रास नव्हता. मी अनाथ आहे हे मला सुरुवातीपासूनच माहीत होतं. मी तीन आठवड्यांची असताना, माझ्या सावत्र पालकांनी आधीही एका मुलीला दत्तक घेतलं होतं; ते एका मुलाला दत्तक घेण्यासाठी पुण्यात आले होते. पण, तेव्हा त्यांना मी दिसले आणि मग पुढे काय झालं ते सगळ्यांनाच माहीत आहे,” असे स्थळेकर यांनी सांगितले.

जेव्हा नशिबाची साथ तुम्हाला असते, तेव्हा आयुष्यात लहान-मोठे चमत्कार होत असतात. असेच काहीसे लिसा यांच्यासोबतही झाले. लिसा स्थळेकर यांचे वडील हरेन आणि जन्माने इंग्लिश असणारी आई सु यांनी नुकत्याच दत्तक घेतलेल्या मुलीच्या पासपोर्टसाठी हालचाल करण्यास सुरुवात केली. अनाथाश्रमातील अधिकाऱ्यांनी लिसा यांचे नाव लैला ठेवले होते. दत्तक घेतल्यानंतर लिसा यांच्या आई-वडिलांनी लैला हे नाव बदलून, लिसा असे नाव ठेवले. त्यानंतर ते सर्व कुटुंब अमेरिकेत राहण्यासाठी निघून गेले आणि लिसा यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.

हेही वाचा : स्त्रियांनो, शरीराला आवश्यक असणाऱ्या ‘या’ घटकाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

अमेरिकेमध्ये १८ महिने आणि केनियामध्ये काही काळ राहिल्यानंतर लिसा यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये लिसासाठी ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवण्यासाठी आले होते. तिथे राहण्याची सर्वांनाच इच्छा असल्याने पुन्हा त्या देशातून जायचे नाही, असे ठरवले.

मुंबईमध्ये वाढलेल्या आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे क्रिकेट खेळलेल्या हरेनला क्रिकेट या खेळाची आवड लिसाला लागावी, अशी इच्छा होती. “माझं आणि माझ्या बाबांचं खूप छान जमायचं. त्यामुळे मी लगेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं,” असे हसत हसत लिसा यांनी सांगितले. क्रिकेटची आवड आणि शिक्षणाला सुरुवात हे लिसा यांच्या नकळतच त्यांच्या घराच्या अंगणात सुरू झाले होते. दक्षिण सिडनीमधील गॉर्डन क्लबमध्ये दाखल झालेल्या लिसा काही काळातच ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामधील एक आदरणीय खेळाडू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

साऊथ वेल्समध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या लिसा यांनी २१ व्या वर्षी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून गोलंदाज म्हणून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले असले तरी सुरुवातीला त्या खालच्या फळीत फलंदाजीही करीत. त्या एक हजार धावा करणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटर बनल्या असून, १०० विकेट्स घेण्याचा विक्रमही लिसा यांनी केला आहे.

पुढे लिसा स्थळेकर कर्णधार असताना २०१२ मध्ये जागतिक टी-२० स्पर्धा आणि २०१३ मधील विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाला मिळवून दिले. त्यानंतर २०१३ मध्ये लिसा यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.

‘बेलिंडा क्लार्क’ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या आणि ऑस्ट्रेलियामधील ‘हॉल ऑफ फेम’मध्येही समाविष्ट करण्यात आलेल्या लिसा स्थळेकर या सध्या कॉमेंट्रेटर व महिला प्रीमियर लीगमधील यूपी वॉरियर्सच्या मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहेत.

कामानिमित्त बऱ्याचदा भारतात येणे होत असल्याने, तसेच क्रिकेटचे भारतीय महिला आणि पुरुष दोन्ही संघ चांगले परिचित असल्याने, तिने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन आठवड्यांत झालेल्या दिल्ली, अहमदाबाद व धर्मशाळा येथील सामन्यात कॉमेंट्रेटरची भूमिका बजावली.

काही काळापूर्वी लिसा यांनी श्रीवत्समधून एक मूल दत्तक घेण्याचा विचार केला होता, असे शर्मिला सय्यद यांनी सांगितले. शर्मिला सय्यद या श्रीवत्स अनाथाश्रमाच्या व्यवस्थापन नियोजक असून, त्यांनीच लिसा यांचे ‘घरी स्वागत आहे’ अशी पाटी हातात घेऊन, नंतर त्यांना ओवाळून त्यांचे २०१२ मध्ये अनाथाश्रमात स्वागत केले होते.

हेही वाचा : मुलांना वरचेवर येतोय ताप? हे चांगलं लक्षण नाही, जाणून घ्या याची कारणं…

“हो, खरे तर असा विचार मी केला होता; पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दत्तक करार नसल्याने मला मूल दत्तक घेता आले नाही. आता मी हा विचार सध्याला बाजूला ठेवला आहे. माझी सध्याची व्यग्र जीवनशैली, प्रवास व वय बघता, हा विचार बाजूला ठेवणे योग्य ठरेल,” असे शर्मिला सय्यद यांच्या माहितीला सहमती दर्शवीत लिसा यांनी सांगितले.

परंतु, आता लिसा ऑस्ट्रेलियामधील ‘अॅडॉप्ट चेंज’ नावाच्या संस्थेच्या बोर्डवर असून, त्याच्या त्या अॅम्बेसेडरदेखील आहेत . रविवारी असणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना त्या जवळच्या मैत्रीण एलिस हिली हिच्यासोबत बघणार आहेत. एलिस हिली ही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील मिशेल एरन स्टार्क याची बायको आहे. “जेव्हा आपली टीम अंतिम फेरीपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा फारच मस्त वाटते आणि हा सामना खूप रंगणार आहे, असे वाटते. भारतीय संघ जरी लाडका असला तरीही ऑस्ट्रेलिया संघानेदेखील इथपर्यंत येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत केली आहे हे विसरून चालणार नाही. आता कोण जिंकणार आणि कोण नाही ते शेवटी आपल्याला समजेलच; पण हा सामना खूप अटीतटीचा होणार असून, शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वांची उत्कंठा ताणून धरणारा असेल हे नक्की.” असेदेखील लिसा स्थळेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch indian born australian cricketer lisa sthalekars journey from shreevatsa to sydney australia dha