भक्तिभावाने, श्रद्धेने उपवास करून देवपूजा करणारे वगळता आजकाल श्रावणातले उपवाससुद्धा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाल्यासारखे झाले आहेत. काही जण मौन पाळतात आणि दिवसभर व्हॉटसपवर बोलत राहतात. पुण्यात तर उपवासाची भेळ, उपवासाचा डोसा, उत्तपा एवढेच काय, पण उपवासाची बिस्किटे व थाळीसुद्धा मिळते. साबुदाणा तर लोकांचा जीव की प्राण. उपवास का धरावा या मूळ संकल्पनेलाच जणू हरताळ फासून ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ या म्हणीप्रमाणे लोक आज उपवासाच्या दिवशीच सर्वात जास्त अपथ्य करताना दिसत आहेत. काही जण उगीच त्या निमित्ताने तरी आपले वजन कमी होईल या भ्रामक आशेपोटी कडक उपवासाच्या नावाखाली स्वत:च्या शरीराला आणि मनाला त्रासच देत असतात. आणि एवढे कडक उपवास करूनसुद्धा सतत उपाशी राहूनही काही लोकांचे एक किलोभरसुद्धा वजन कमी होत नाही. काय असेल यामागचे नक्की कारण? खरंच अन्न म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? वजन वाढते म्हणजे नक्की काय वाढते?

आज या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे देऊन फक्त आयुर्वेदच आपले समाधान करू शकतो. आमचे सर म्हणायचे, ‘जे आपल्याला खाते आणि ज्याला आपण खातो त्याला अन्न असे म्हणतात.’ वरवर फार क्षुल्लक वाटणाऱ्या अन्नाच्या या व्याख्येत फार मोठा अर्थ दडला आहे. म्हणून आपण काय खात आहे याकडे अगदी कटाक्षाने लक्ष द्या. नाहीतर तेच अन्न आपल्याला खाऊन टाकते अर्थात वेगवेगळे आजार उत्पन्न करते. ज्याप्रमाणे आपल्याला आपली काही राहिलेली कामे करण्यासाठी आठवडय़ातून एक दिवस तरी सुट्टी असावी वाटते. ती मिळाली तर आपली राहिलेली कामेही होतात आणि पुढील कामेही होतात, नाहीतर ताण वाढत जातो त्याचप्रमाणे रोज दोन वेळा अन्न सेवन करून एक वेळा शौच विधीला जाऊनसुद्धा, अहोरात्र कामे करूनही आपल्या पचनशक्तीची काही पचनाची तर काही साफसफाईची कामे राहिलेली असतात. त्यासाठी त्यांना आठवडय़ातून एक दिवस तरी पचनाला हलका आहार किंवा उपवास करून वेळ द्यावा. यामुळे शरीराची स्वच्छताही होते आणि पचन प्रक्रियाही सुधारते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींना दिवस दिवस जपतप करत बसावे लागे. भूक लागून कार्यात मन विचलित होऊ  नये म्हणून ते पचायला जड अशी कंदमुळे, रताळे, बटाटे असा आहार करायचे व कामाला लागायचे. त्यामुळे १२-१४ तास काहीही न खाता काम करता येत असे आणि भूकही लागत नसे. मात्र आता काम कमी आणि जड आहार सेवन उपवासाच्या नावाखाली वाढला आहे. त्यामुळे वजन वाढण्यापासूनच अनेक विकार मागे लागत आहेत. कल्पना करा की तुम्ही रोज सरासरी पावशेर नाश्ता दोन वेळा, अर्धा अर्धा किलो जेवण दोन वेळा व किमान तीन चार लिटर पाणी म्हणजे तीन किलो द्रव आहार असा एकूण रोज चार ते पाच किलो आहार घेत आहात. म्हणजेच आठवडय़ाला ३२ किलो. अर्थात महिना सरासरी १३० किलो. वर्षांला १५६० किलो. अहो हे काय एक छोटा हत्तीच फस्त केला की आपण पाहता पाहता एका वर्षांत. मग नक्की एवढे अन्न जाते कुठे? साधारण १ ते २ किलो द्रव मल व एक किलो घन मल मान्य केला तरी दिवसाला मल भाग फक्त सरासरी दोन किलो तयार होतोय. म्हणजे राहिलेले अन्न साठत गेले तर वजन वाढत आहे व ऊर्जेच्या स्वरूपात नष्ट झाले तर कार्य होत आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा फक्त एका थेंबाच्या आकाराएवढा असतो. नंतर नऊ  महिन्याने तो अडीच तीन किलोचा होतो व वयाच्या चाळिशीला साधारण सत्तर ते ऐंशी किलोचा. काही कमी तर काही जास्त. यापुढे मात्र काहीजणांचा वजनाचा काटा कित्येक वर्षे थोडासुद्धा हलत नाही. आहार मात्र तेवढाच असतो. म्हणजे पाहा किती विचार करायला लावणारे आहे हे अन्नाचे गणित. आपल्याला वाटते तितके सोपे तर नक्कीच नाही.

म्हणून आजकाल उपवास हा भाताची पेज, मुगाचे कढण, साळीच्या लाह्य़ा यांचे सेवन करून करायला हवा. याने पचनशक्तीला योग्य विश्रांती मिळते तसेच भूक वाढून शरीरातील वाढलेल्या मलांना बाहेर टाकायला संधीही मिळते. मळ शरीरात साठून राहिला नाही की शरीर व मन प्रसन्न राहतात. उत्साह वाढतो, नवनिर्मिती सुचते व वजनही वाढत नाही. लक्षात ठेवा आपण काय खावे यापेक्षा आपण किती खावे याला जास्त महत्त्व असते आणि तेही शक्य नसेल तर कमीत कमी काय खाऊ  नये याला त्याहून अधिक महत्त्व असते.

 

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती

feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा