१ : शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर एका तरुणीने प्रवेश केल्यामुळे त्या चौथऱ्याची, शनीच्या शिळेची दुधाच्या अभिषेकाने शुद्धी करण्यात आली. महिलेच्या मंदिरप्रवेशाच्या घटनेविरोधात संपूर्ण गावाने बंदची हाक दिली. २ : मुंबईतील हाजी अली दग्र्यातील कबर परिसरात महिलांना प्रवेशबंदी असून त्याविरोधात एका महिलेनेच न्यायालयात खटला दाखल केला आहे. ३ : महिलांना मंदिरप्रवेशासाठी योग्य काळ कोणता हे शोधण्याचे यंत्र आले, की मग त्यांना सबरीमल मंदिरात प्रवेशास परवानगी देण्यात येईल असे त्रावणकोर देवासम विश्वस्त संस्थेचा एक अधिकारी म्हणाला. या सर्व घटना महिलांचे धर्मातील स्थानच स्पष्ट करणाऱ्या असून, जोवर समाजाच्या धर्मविचारांतील पुरुषी मानसिकता दूर होत नाही तोवर येथे खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व नांदूच शकणार नाही हेच अधोरेखित करणाऱ्या आहेत. या घटनांचा सार्वत्रिक निषेध होत असतानाच अनेकांच्या दृष्टीला त्यात काही वावगे असल्याचे वाटत नाही, किंबहुना धर्म आणि परंपरा यांच्या नावाने अशा प्रवेशबंदीचे समर्थनच केले जात आहे. एवढेच नव्हे, तर ‘हा विषय स्त्रीमुक्तीचा नसून पूर्णत: आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्याची चिकित्सा सामाजिक दृष्टिकोनातून तसेच धर्माचा अभ्यास नसणाऱ्यांनी करणे अयोग्य ठरते,’ असे बजावून सांगितले जात आहे. ही सनातनी प्रवृत्ती आज संख्येने कमी असली म्हणून त्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करणे हे घातक ठरू शकते. उलट या अशा विधानांतून भारतीय समाजापुढे कोणता भविष्यकाळ वाढून ठेवलेला आहे त्याचीच झलक पाहावयास मिळते आहे. वरवर पाहता धर्माभ्यासकांनीच या विषयावर बोलावे या सांगण्यात काहीही गर नसल्याचे वाटेल; परंतु हा बुद्धिभेद करणारा युक्तिवाद आहे. याची कारणे दोन. पहिले म्हणजे धर्म हा समाजाची धारणा करणारा असेल तर तो निश्चितच सामाजिक विषय आहे. तो केवळ अध्यात्माचा प्रांत राहत नाही आणि दुसरी बाब म्हणजे अशा विषयांवर केवळ धर्माभ्यासकांनीच बोलावे याचा साधा अर्थ केवळ धर्माच्या ठेकेदारांनीच बोलावे असा होतो. ही मंडळी मग ‘शनी ही उग्रदेवता असून तिच्यातील प्रकटशक्तीमुळे महिलांना त्रास होण्याची शक्यता असते’ असे अध्यात्मविज्ञान(?) मांडून भोळ्याभाबडय़ा लोकांची दिशाभूल करण्यास मोकळे. याबाबत सर्वच धर्मठेकेदार कसा विचार करीत असतात हे पाहावयाचे असल्यास केरळमधील सुन्नी नेते कांथापुरम अबूबकर मुसलयार यांच्या इस्लामदर्शनाकडे पाहावे. स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्वच इस्लामविरोधी असल्याचे मत त्यांनी जाहीरपणे मांडले आहे. ते पाहिले की सर्वच धर्मातील समभाव कसा झळाळून समोर येतो! मुळात महिलांच्या प्रार्थनास्थळ प्रवेशाचा मुद्दा हा महिलांच्या प्रतिष्ठेशी निगडित आहे. मासिक पाळीमुळे महिला अपवित्र होते हे मध्ययुगीन समाजाने म्हटले तर त्यांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा तरी देता येईल; पण हाच विचार आजचा समाजही मानत असेल तर मात्र त्याच्या विचाराच्या इंद्रियात मोठाच बिघाड आहे असे म्हणावे लागेल. परंपरांचा सन्मान करण्यास कोणाचीच हरकत नसते; पण त्या परंपरा माणूसपणाची अप्रतिष्ठा करणाऱ्या नसाव्यात. हे तत्त्व आपल्याकडील अनेक संतसज्जनांनी मांडलेले आहे. आजच्या धर्मठेकेदारांना ते मान्य नसेल, परंतु ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा संतविचार हाच भारतीय समाजाचा पाया आहे. तो भक्कम करण्याचे सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात महिलांना स्वातंत्र्य नाही म्हणून आमच्या धर्मातील महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल, समानतेबद्दल कोणी बोलता कामा नये, असे सांगणे म्हणजे दुसऱ्याच्या घरातील घाण आपल्याही घरात का नाही याबद्दल हळहळण्यासारखे आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या भूमीतील शनििशगणापूरमध्ये जे घडले ते धर्मालाच नव्हे तर संतांनी सांगितलेल्या माणुसकीलाही शोभा देणारे नाही याचा विचार हे धर्मठेकेदार करणार नाहीत; तो ज्याचा-त्यालाच करावा लागणार आहे.