कर्जाचे प्रचंड ओझे असलेल्या पायाभूत विकास क्षेत्रातील प्रमुख कंपनी जीएमआर इन्फ्राने अलीकडेच विद्यमान भागधारकांना हक्कभाग विक्री (राइट्स इश्यू) करून १,४०० कोटी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
यापैकी प्रवर्तकांनीच त्यांच्याकडे असलेल्या समभागांचे हक्कभाग खरेदी करून १,२५० कोटी रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली आहे. विविध आघाडय़ांवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून आर्थिक वर्ष २०१६ अखेर कंपनीचे कर्ज-भांडवल गुणोत्तर सुधारून चारच्या खाली येईल, असे कंपनीच्या वित्तीय अधिकाऱ्याने सांगितले.
तब्बल ४६,००० कोटी रुपयांचा कर्जाचा भार डोईवर जीएमआर इन्फ्राने गेल्या दीड वर्षांत आपले कर्जदायित्व ६,००० कोटी रुपयांनी घटविले असून, त्यासाठी विविध २२ प्रकल्प आणि मालमत्तांमधील आपल्या मालकीची विक्री केली आहे. येत्या वर्षभरात या कामी मदतकारक ठरेल अशा आणखी ४,००० कोटी रुपयांची निर्गुतवणूक करण्याचे कंपनीचे नियोजन असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या समभागाचा ५२ सप्ताहातील उच्चांक स्तर ३८.३० रुपये असून, बुधवारी १ एप्रिल रोजी झालेल्या मुंबई शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात १.२० टक्क्य़ांच्या वाढीसह १६.८० रुपयांवर हा समभाग स्थिरावला.
नजीकच्या काळात व्याजाचे दर खाली येऊ घातले आहेत. जीएमआर इन्फ्राला व्याजदरात १ टक्क्य़ाने घट होण्याचा जरी लाभ मिळाला तरी कर्जावरील व्याज परतफेडीपोटी वार्षिक ४६० कोटी रुपये वाचविले जातील, जे कंपनीच्या नफ्यात भर घालणारे ठरतील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूसंबंधी नव्या धोरणाचा जीएमआरच्या वायूआधारित ऊर्जा प्रकल्पांना लाभ मिळून त्यांची कार्यक्षमता उंचावणारा परिणाम दिसून येणे अपेक्षित आहे.