सलग पाचव्या व्यवहारात तेजी नोंदविणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारी महिन्याच्या वरच्या टप्प्यावर गेला. १७७.४६ अंश वाढीने सेन्सेक्स २८,८८५.२१ पर्यंत झेपावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६३.९० अंश भर राखत निर्देशांकाला ८,७७८.३० पर्यंत नेले.
‘मूडी’ या पतमानांकन संस्थेने भारताच्या मानांकनाबाबत आश्वासक दिलासा दिल्याने बाजारात एकूणच खरेदीचे वातावरण कायम राहिले. दिवसभरात याच तेजीच्या जोरावर मुंबई निर्देशांक गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने २८,६२२.४४ या दिवसाच्या तळातही आला. मात्र दिवसअखेर त्यात बुधवारच्या तुलनेत १७५ हून अधिक अंशांची वाढ नोंदली गेली.
सेन्सेक्स गेल्या पाचही व्यवहारात तेजी नोंदवित आला आहे. या दरम्यान त्याची वाढ ९२७.७२ अंश राहिली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभराच्या उच्चांकावर विराजमान होत तो १२ मार्चच्या २८,९३०.४१ या टप्प्यानजीक आता येऊन ठेपला आहे. निफ्टीचा प्रवासही दिवसभरात ८,७८५.५० ते ८,६८२.४५ दरम्यान राहिला.
बुधवारच्या व्यवहारात एकूण मुंबई निर्देशांकाच्या तेजीनंतरही घसरणीतर राहिलेल्या बँक निर्देशांकाने गुरुवारीत वाढीची कामगिरी बजावली. या क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक यांचे समभाग मूल्य वाढले. बँक क्षेत्रात पंजाब नॅशनल बँक हा सर्वाधिक ६.०३ टक्के वाढीसह आघाडीवर होता.
चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या भाग विक्री प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या आरईसीचा समभाग गुरुवारी १.८ टक्क्य़ांनी वाढला. व्यवहारात ३४६ रुपयांपर्यंत उसळल्यानंतर दिवसअखेर तो ३३६.२५ रुपयांवर स्थिरावला.