एकूणच पुढील आठवडा हा भाषेचा आहे. म्हणजे २१ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन, तर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे; पण तरीही पुढील आठवडय़ाला भाषेचा आठवडा म्हणण्यामागे आणखीही एक ठोस कारण आहे. ते म्हणजे या दोन दिवसांच्या दरम्यान, म्हणजेच २५ व २६ फेब्रुवारीला मुंबईत होणारा ‘एलआयसी गेटवे साहित्य महोत्सव’. प्रादेशिक भाषांचा हा भारतातील पहिला ‘लिटफेस्ट’ अशी त्याची ख्याती. यंदाचे या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून ‘भारतीय वाङ्मयाचा आधुनिक चेहरा’ या विषयाभोवती तो गुंफला जातो आहे. त्यात बंगाली, तामिळ, पंजाबी, मल्याळी व मराठी या पाच भाषांसह इतर देशी भाषांच्या साहित्यातील  आधुनिक जाणिवांचा वेध घेणारी विविध सत्रं या महोत्सवात होणार आहेत.

गेल्या दोन्ही पर्वात येथे भारतीय भाषांतील अनेक मान्यवर साहित्यिकांनी उपस्थिती लावली होती. या वर्षीचा महोत्सवही त्याला अपवाद नाही. हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंग, गुजराती कादंबरीकार रघुवीर चौधरी या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांबरोबरच देसराज काली (पंजाबी), दामोदर मावजो (कोंकणी), अंजली मेनन (केरळ), वसंत बालन (तामिळ), शफी शाक (काश्मिरी), सुबोध सरकार, तिलोत्तमा मजुमदार (बंगाली), हलधर नाग (कोसली), डेसमंड खर्मावफ्लँग (खासी), चंदन दत्त (मैथिली), के. आर. मीरा, एम. मुकुंदन (मल्याळी), परिचय दास (भोजपुरी), अंजू मखिजा, मिहीर चित्रे (इंग्रजी) यांच्यासह मराठीतील मल्लिका अमरशेख, लक्ष्मण गायकवाड, शरणकुमार लिंबाळे, कुमार केतकर, सचिन केतकर, संजीव खांडेकर, हेमंत दिवटे, सलील वाघ, मंगेश काळे, रमेश सूर्यवंशी असे एकूण १५ भारतीय भाषांतील तब्बल ५० लेखक यंदाच्या महोत्सवात सहभागी होत आहेत.

या दोन दिवसीय महोत्सवात भोजपुरी, अहिराणी, कोंकणी, खासी, संथाली यांसारख्या लिपीविरहित भाषांमधील साहित्याविषयीचे चर्चासत्र, ‘भारतीय चित्रपट म्हणजे बॉलीवूड नव्हे’ या विषयावरील परिसंवाद यांसारख्या सत्रांबरोबरच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यम संपादिका मिनी कृष्णन, पेंग्विनचे संपादक अंबद साहिल चटर्जी आणि वाणी प्रकाशन या हिंदीतील महत्त्वाच्या प्रकाशनाच्या संपादिका अदिती महेश्वरी यांची व्याख्याने ऐकण्याची संधी मिळणार आहे.