विनोबांचे ‘मधुकर’ या पुस्तकातील शिक्षणावरचे एक सुंदर वाक्य आहे- ‘अश्व या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे, पण त्याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे. कोशातून बाहेर पडून तबेल्यात गेल्याशिवाय घोडा कळणारच नाही,’ हे वाक्य कोणत्याही शिक्षणाच्या प्रयोजनाचे जणू मर्मच अधोरेखित करते. पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून, प्रत्यक्ष कामातून आणि मूर्त संकल्पनेतून अमूर्त संकल्पनेकडे अशा प्रवासातून केलेले ज्ञानार्जन हे चिरकाल टिकणारे आणि सामथ्र्यशील असते, असे खरेतर शिक्षणशास्त्र सांगते. पण आज किती ज्ञानशाखांमध्ये अभ्यासक्रम शिकवताना याचा आधार घेतला जातो? किती विद्यार्थ्यांना आपल्या आपल्या विषयातील घोडे हे कोशात नाही तर तबेल्यात शिकायला मिळतात? तसेच असे विद्यार्थी घडवण्याची क्षमता आणि मानसिकता असणारे शिक्षकसुद्धा दुर्मीळच असतात.
राजू भडके हा तरु ण मात्र या शिक्षकांना अपवाद. राजू मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याचा. बी.एड्. नंतर पुढे काय या प्रश्नात गुंतलेला असताना डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ या युवा चळवळीत सहभागी होण्याची त्याला संधी मिळाली. तेथील शिक्षण आणि इतर विषयांतील तज्ज्ञांच्या मार्गदशर्नाने काहीतरी वेगळे करण्याच्या मनातील सुप्त इच्छेला एक मूर्त रूप प्राप्त झाले. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राध्यापक रमेश पानसे यांच्या ‘ग्राममंगल’ या संस्थेत तो रु जू झाला. संस्थेला ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांसारख्या नावाजलेल्या शिक्षणतज्ज्ञांचा उज्ज्वल इतिहास. प्रत्यक्ष कामातून व खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून मनोरंजन ही ग्राममंगलच्या शैक्षिणक पद्धतीची विशेषता.
डहाणू तालुक्यातील ‘ऐना’ या आदिवासी खेडय़ामध्ये तो शिक्षक म्हणून दाखल झाला. या शाळेतील राजूचे सर्व विद्यार्थी आदिवासी. वारली, कातकरी किंवा मन्हारकोळी या जमातीचे. बोलीभाषा वारली! घरात शिक्षणाचे वातावरण नाही. शिकून पुढे सक्षम होण्याचे स्वप्न दाखवणारे कुणी नाही. अशा मुलांना त्यांच्या आदिवासी संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवून आजूबाजूच्या परिस्थितीला अनुरूप असे शिक्षण देऊन शहाणे करणे हे राजूसमोरील आव्हान होते.
आदिवासी बालशिक्षणाची सगळी परिमाणेच वेगळी होती. त्यांना जाणवणारा प्रमाण भाषेचा अडसर, पाठय़पुस्तकातील संदर्भ आणि त्यांच्या व्यावहारिक जीवनातील संबंध यामधील दरी या सर्व मर्यादांचे भान ठेवून मुलांना शिकवणे ही खरी गरज होती आणि यातच राजूच्या शिक्षकी पेशाचा खरा कस लागणार होता.
लहान मूल हे अनुकरणातून शिकते. बालवाडीत ते शिक्षकाकडून शिकते तसे घरी आई वडिलांकडून शिकते. त्यामुळे आदिवासींची कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था समजून घेण्यासाठी राजूने या आदिवासी लोकांमध्ये अधिक वावरायला सुरुवात केली. ग्रामसभांना उपस्थित राहणे, पालकांच्या सभा घेणे, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, मुलांशी वारली भाषेत संवाद साधणे यातून तो आदिवासी संस्कृतीशी हळूहळू परिचित होऊ लागला. आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ‘माणूस’ म्हणून समजून घेण्याची त्याची ही पहिली पायरी ठरली.  
आदिवासी मुलांच्या शिक्षणातील अंतर्भूत मर्यादांना डोळ्यासमोर ठेवून ग्राममंगलने अनेक अभिनव उपक्रम आणि शैक्षिणक साहित्य तयार केले आहे. ‘मुक्तशाळा’ हा असाच एक उपक्रम. ही शाळा कधी झाडाखाली भरते तर कधी नदीकाठी. सर्व इंद्रियांनी ज्ञानार्जन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मुक्तशाळेत मिळते. राजू वर्गातील मराठीच्या पुस्तकातले कधीही न पाहिलेले सफरचंद मुलांना हाताळायला देतो. चव घ्यायला लावतो. पुस्तकातील भेळेचा उल्लेख हा मुक्तशाळेत एक अमूर्त संकल्पना न राहता सर्व मुलं कांदा, टोमॅटो, चुरमुरे एकत्र खाऊन भेळेचा मुलांना परिचय करु न दिला जातो. सहकार्यातून शिक्षण, समूह शिक्षण, विविध टप्प्यांतील शिक्षण हे शिक्षणातले सर्व सिद्धान्त मुक्तशाळेत प्रत्यक्षात उतरताना दिसतात.  ग्राममंगलमध्ये न शिकणाऱ्या इतर मुलांनाही येथील शैक्षणिक पद्धतीचा लाभ मिळावा, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘विकासघर’ या उपक्रमातही राजूचा सहभाग होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा झाल्यावर विकासघरात ‘गणित’ आणि ‘भाषा’ हे विषय अभिनव पद्धतीने शिकवले जातात.   
विद्यार्थ्यांना पंचेद्रियांनी शिक्षण देताना राजूचेही सर्व अंगांनी शिक्षण होत होते. मुक्तशाळेत शिक्षकाची जबाबदारी पार पाडता पाडता एक वर्षांनंतर त्याच्याकडे मुक्तशाळेच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी आली. सोबतच वसतिगृहप्रमुख व परिसरातील बालवाडय़ा यांच्या समन्वयनाचे कामही तो पाहू लागला. तसेच संस्थाभेटीसाठी येणाऱ्या तज्ज्ञांना संस्थेची माहिती देणे या कामांमध्येही त्याच्या सहभाग वाढू लागला. साडेतीन वर्ष ग्राममंगलसोबत काम केल्यावर राजू आज ‘प्रथम’ या संस्थेशी निगडित आहे. ‘प्रथम’मध्ये ‘गणित’ या विषयावरील राष्ट्रीय समितीमध्ये प्रशिक्षक आणि पाठय़क्रम विकसनामध्ये आज तो कार्यरत आहे. तसेच (Pratham Open School)) या उपक्रमांतर्गत कमीत कमी चौथी पास असलेल्या मुलांना १७ क्रमांकाचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेसाठी तयार करणे व त्यांची शिक्षणाची गाडी परत रुळावर आणण्याच्या जोखमीच्या कामात सध्या तो सहभागी आहे. ग्राममंगलमधील बालशिक्षणाच्या तुलनेत प्रौढशिक्षणाची आव्हाने वेगळी! फार पूर्वी शाळा सोडलेले, मध्यंतरीच्या काळात अभ्यासाची बैठक मोडलेले, नापास झाल्यामुळे परीक्षेची भीती बसलेले असे सर्व आता राजूचे विद्यार्थी आहेत. कामाचे स्वरूप बदलले असले तरी शिक्षण का, कसे आणि कुणासाठी या विचारांची राजूची बैठक पक्की झाल्यामुळे ग्राममंगलचा अनुभव त्याला पायाभरणीइतकाच महत्त्वाचा वाटतो.
राजू चार भिंतींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमत नाही. गांधीजींची नई तालीम पद्धत त्याला अधिक भावते आणि म्हणूनच जीवन आणि शिक्षण यांना अद्वैत मानून ज्ञानदान करणाऱ्या संस्था ही त्याला काळाची गरज वाटते.  
‘शिक्षण हक्क कायद्या’मध्ये कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असा आग्रह धरला गेला आहे. परंतु, या कायद्यांतर्गत निव्वळ शाळेची इमारत, वर्गातील बाक, पुस्तके, गणवेष या पायाभूत सोयीं सुविधांचा विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ असे अभिप्रेत नाही तर शिक्षणाची खरा गुणवत्ता ही शाळेतील शिक्षक, त्यांचा शिकवण्याचा दर्जा यावर अवलंबून आहे. राजू आणि त्यासारखे तरु ण शिक्षक एकत्र मिळून कदाचित ‘शिक्षण हक्क कायदा’ खऱ्या अर्थाने अमलात आणण्यास हातभार लावतील. अन्यथा ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांनी म्हणल्याप्रमाणे मला खूप शिकायचे होते, पण शाळा आडवी आली असे म्हणण्याची वेळ आपल्यावरही येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजू भडके हा युवक बी.एड्. झाल्यानंतर विविध प्रयोगशील शाळांच्या उपक्रमात सहभागी झाला. बालशिक्षण ते प्रौढशिक्षणात विविध प्रयोगशील संकल्पना राबविण्यात पुढाकार घेणारा राजू चार भिंतीच्या पल्याडच्या शिक्षणाचा सदैव विचार करतो.