राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे उत्पादन हटवले

राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या पायपुसण्याची विक्री करण्यात येत असल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने त्याबद्दल माफी मागून सदर उत्पादन कॅनडाच्या संकेतस्थळावरून दूर करण्यात आल्याचे जाहीर केले.

सुषमा स्वराज यांना पाठविलेल्या पत्रांत ‘अ‍ॅमेझॉन’चे उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी म्हटले आहे की, राष्ट्रध्वज असलेल्या उत्पादनाबाबत आपण हे पत्र लिहीत आहोत, भारतीय कायदे आणि रूढी-परंपरा यांचा आदर करण्यास अ‍ॅमेझॉन इंडिया वचनबद्ध आहे. भारतीयांच्या भावना दुखावण्याचा आमचा कधीही हेतू नव्हता.

अ‍ॅमेझॉन कॅनडा राष्ट्रध्वजाच्या पायपुसण्यांची विक्री करीत असल्याची तक्रार आल्यानंतर स्वराज यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि अ‍ॅमेझॉनला हे उत्पादन मागे घेऊन बिनशर्त माफी मागण्यास फर्मावले होते. त्यानंतर कंपनीने माफे मागत असल्याचे जाहीर केले.