भारताने दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले. डोकलाममध्ये चिनी सैन्यासोबत दोन महिने चाललेला तणाव संपल्याच्या पार्श्वभूमीवर रावत बोलत होते. ‘उत्तरेकडील सीमेवर तणाव निर्माण झाल्यास पश्चिम सीमेवरील देश या परिस्थितीचा फायदा उठवू शकते,’ असे सूचक आणि महत्त्वपूर्ण विधान लष्करप्रमुखांनी केले. ‘भविष्यातील लढाई’ या विषयावर ते दिल्लीत बोलत होते.

‘भारताला उत्तर (चीन) आणि पश्चिम सीमा (पाकिस्तान) आहेत. पश्चिमी सीमेवर कोणत्याही प्रकारचा समझोता होईल, अशी आशा आम्हाला नाही. कारण भारताचे तुकडे करण्याचे स्वप्न त्या भागातील राजकारणी, सामान्य जनता आणि लष्कराकडून पाहिले जाते. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्याकडून छुपे युद्ध सुरु आहे. आपला देश किती काळ हे युद्ध सहन करत राहणार? आता सहनशक्ती संपली हे आपण केव्हा ठरवणार आणि केव्हा युद्ध सुरु होणार? याबद्दल आताच काही बोलणे अवघड आहे,’ असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले.

छुप्या युद्धांमुळे पश्चिमी सीमांवर कायमच तणावाची स्थिती असते, असेही लष्करप्रमुखांनी म्हटले. ‘उत्तरी सीमेचा विचार केल्यास आपण किती सहन करु शकतो, याची पडताळणी केली जात आहे. त्यांच्याकडून (चीनकडून) आव्हानाची भाषा सुरु आहे, जमिनीवरील हस्तक्षेप वाढवण्यात येत आहे. भारताची सहनशक्ती किती आहे, याचा अंदाज घेतला जात आहे,’ असे विश्लेषण त्यांनी केले.

‘उत्तरेकडच्या सीमेवरील तणाव किती वेळ आणि कोणत्या भौगोलिक मर्यादेपर्यंत टिकून राहिल, याबद्दल आजच्या घडीला काही बोलता येणार नाही. उत्तरेकडील सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाल्यास ते अधिक काळापर्यंत सुरु राहिल का, त्याची झळ जास्तीत जास्त भागाला बसू शकेल का, याविषयी आता ठोस विधान करणे अवघड आहे’ असेही ते पुढे बोलताना म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पश्चिमेसह उत्तरेकडील सीमेवरील तणावासाठी सज्ज राहायला हवे, असे महत्त्वपूर्ण विधान रावत यांनी केले.