नवी दिल्ली : ‘चारसौ पार’चा नारा देऊन मैदानात उतरलेल्या भाजपपुढे सर्वात मोठे आव्हान महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचे असल्याचे स्पष्ट होत आहे. २०१९च्या सत्तास्थापनेत या दोन्ही राज्यांतील ८० जागांचा महत्त्वाचा वाटा होता. यंदा ही संख्या सहज गाठणे अशक्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही राज्यांत मोदींच्या दररोज तीन-तीन प्रचारसभा घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवाय, घटकपक्षनेत्यांच्या बेपर्वा विधानांमुळे जागांचा फटका बसू नये याचीही दक्षता घ्यावी लागत आहे.

महाराष्ट्र व बिहार दोन्ही राज्यांत मिळून लोकसभेच्या ८८ जागा असून गेल्या निवडणुकीत ‘रालोआ’ला ८० जागा मिळाल्या होत्या. यावेळी दोन्ही राज्यांतील जागांमध्ये घट झाली तर बहुमताचे लक्ष्य गाठण्यासाठीच्या आवश्यक जागांची तूट कशी भरून काढायची, यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचे समजते. पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगणा या तीन राज्यांमध्ये जागा वाढण्याचा भाजपचा अंदाज आहे. तरीही, या तीन राज्यांत मिळून ८० जागा आहेत. ओदिशामध्ये भाजपच्या जागांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ६२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. इथे किमान १० जागांची भर घालण्याचे लक्ष्य आहे. अशा परिस्थितीत भाजपला महाराष्ट्र व बिहार याच दोन्ही राज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या वेळी महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी अखंड शिवसेना व भाजप युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी राज्यात महायुतीच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आल्याने पंतप्रधानांच्या सभांमधून अनुकूल वातावरणनिर्मिती करण्याची धडपड सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे तारांकित प्रचारक असले तरी, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मतदारांना प्रचारसभांमधून भावनिक साद घातल्यामुळे मोदींनाच प्रत्युत्तर द्यावे लागत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>> सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी

बिहारमध्ये भाजपने नितीशकुमार यांचा जनता दल (सं) व चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती व अन्य घटक पक्षांना पुन्हा रालोआमध्ये सहभागी करून घेतले आहे. तरीही तेथील जागा कमी होण्याची भीती भाजपला आहे. गेल्या वेळी ४० पैकी ३९ जागा रालोआला मिळाल्या होत्या. यंदा प्रचाराची जबाबदारी नितीशकुमार यांच्यावर सोपवण्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भाषणांवर देखरेख ठेवली जात आहे. त्यांनी भाषणांत कोणते मुद्दे बोलायचे हेही आधी निश्चित केले जात असून त्याव्यतिरिक्त एकाही मुद्दयावर त्यांनी बोलू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिहारमध्येही मोदींच्या सभांवर एनडीएची भिस्त आहे.

भाजपच्या प्रचाराची दिशाही टप्प्यागणिक बदलण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजना, २०४७चे विकसित भारताचे लक्ष्य तसेच, राम मंदिर- ३७० आदी मुद्दयांची विभागणी झाली होती. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे मुद्दे प्रचारामध्ये आणले जाणार आहेत. त्याची सुरुवात संपत्तीचे फेरवाटप व मंगळसूत्र यापासून झाली. निवडणूक उत्तरेकडे सरकत असून प्रादेशिक परिस्थितीनुसार प्रचारात बदल होणार असल्याने मोदींच्या प्रचारसभांमध्ये प्रखर काँग्रेसविरोध व हिंदू-मुस्लीम हे विषय आणखी तीव्र केले जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत मोदींच्या राज्यात १२ सभा

मुंबई : तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारापर्यंत महाराष्ट्रात मोदींच्या १२ सभा पार पाडल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी त्यांच्या सहा सभा झाल्या. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तीन, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात दोन आणि तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात एकूण सात सभा झाल्या. मोदी यांच्या सभांचे नियोजन करताना दोन किंवा तीन मतदारसंघांचा विचार केला जातो. मात्र सोलापूर आणि माढा या एकाच जिल्ह्यातील मतदारसंघांसाठी मोदी यांनी स्वतंत्र सभा घेतल्या. त्यांच्या राज्यात आणखी पाच ते सहा सभा होण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची भव्य सभा घेण्याची योजना आहे. पुढील आठवडयात कल्याणमध्ये सभा होईल. बिहारमध्येही मोदींनी आत्तापर्यंत सहा सभा घेतल्या असून तेथही आणखी सभांची शक्यता आहे.