इंटरनेटची वाटचाल क्षमतेबाबतचा निर्णायात्मक प्रसंग ओढावण्याच्या दिशेने होत असून पुढील ८ वर्षांत इंटरनेटच्या वापर क्षमतेवर मर्यादा येण्याची भीती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, टॅबलेट्समध्ये इंटरनेटच्या माहितीचे वहन करणाऱया केबल्स आणि फायबर ऑप्टिक्स येत्या आठ वर्षात त्यांच्या मर्यादेची परिसीमा गाठतील. त्यामुळे फायबर ऑप्टिकल केबल्सना सिंगल ऑप्टिकल केबलमधून माहिती घेण्यावर अनेक मर्यादा येतील असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
इंटरनेटचा वापर असाच सुरू राहिल्यास पुढील २० वर्षांत एकट्या ब्रिटन शहराला लागणाऱया वीज पुरवठ्याएवढी गरज फक्त इंटरनेटच्या वापरासाठी लागेल. या गंभीर विषयाची दखल घेत जगातील अग्रगण्य अभियंते, भौतिकशास्त्रज्ञ आणि टेलिकॉम कंपन्यांनी ११ मे रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत वेब संकटावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
जागतिक पातळीवर इंटरनेटचा वापर क्षणागणिक वाढत जात असून इंटरनेटच्या सुरळीत वहनासाठीच्या तंत्रज्ञानातही तितकाच अद्ययावतपणा राखण्याचे प्रयत्न आजवर केले गेले आहेत. मात्र, भविष्यात हे सर्व सुरळीत ठेवता येऊ शकणार नाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागेल. तो दिवस दूर नसल्याची शक्यता या बैठकीचे सह-आयोजक प्राध्यापक अँड्र्यू एलिस यांनी वर्तविली आहे.
इंटरनेट, दूरदर्शन, लाइव्ह स्ट्रीमिंग सेवा आणि अद्ययावत शक्तीशाली संगणक यांचे वाढते प्रमाण या गोष्टी संचार क्षेत्राच्या पायाभूत सुविधेवर ताण वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. इंटरनेट केबल्स आणि फायबर ऑप्टिक्सने आपली मर्यादा गाठताच इंटरनेट कंपन्यांना अधिकच्या केबल्स जोडाव्या लागतील. पण, यामुळे वीज बिलात वाढ होईल आणि याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागेल. परिणामी ग्राहकांना दुप्पट किंमत मोजावी लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, २००५ साली ब्रॉडबँड इंटरनेटचा सर्वाधिक वेग प्रति सेकंद २ मेगाबाईट्स इतका होता. तर, सध्या जगाच्या काही भागात दर सेकंदाला १०० एमबी इतका डाऊनलोड वेग उपलब्ध आहे.