लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. १ जून पर्यंत देशात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडतील आणि ४ जून या दिवशी निकाल लागणार आहे. या निकालात आम्ही ४०० जागा पार करु असा विश्वास एनडीए आणि भाजपाने व्यक्त केला आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रचाराचा धडाकाही सुरु आहे. याच सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?

“बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची ती आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक प्रकारे आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, “पिक्चर अभी बाकी है, हे मोदींचं वाक्य भीतीदायक”

उद्धव ठाकरे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर सत्तेसाठी जाऊन बसले हे लोकांना मुळीच पटलेलं नाही. भावनिकदृष्ट्या लोक भाजपाबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या मेहनतीने पक्ष उभा केला. एक विचार महाराष्ट्राला दिला. तो सोडून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेससह गेले? हे जनतेला पटलेलं नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगत उद्धव ठाकरेंवर भाष्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत

याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसंच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला विचारलं होतं मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. याच मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे.