पाकिस्तानकडून घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या एका उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्याने सज्जड दम दिला आहे. पाकिस्तानने आपल्या वर्तणुकीत जर सुधारणा केली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराच उत्तर मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडर इनचार्ज (जीओसी) लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी दिला.

एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, लाइन ऑफ कंट्रोलसारखी अशी कुठली लाइन नाही. जी पार केली जाऊ शकत नाही, हे आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून दाखवून दिलं आहे. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही ती सक्षमपणे पार करू. गरज पडल्यास आम्ही पुन्हा पलीकडे जाऊन हल्ला ही करू, असे सांगत टेरर फंडिंग प्रकरणी फुटीरतावादी नेत्यांवर एनआयएने सुरू केलेल्या कारवाईमुळे काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अन्बू यांनी एलओसीजवळील परिसरात गेल्या एक वर्षांत दहशतवादी लाँच पॅड्स आणि शिबिरात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे मान्य केले. पीर पंजालच्या दक्षिण आणि उत्तरेला मोठ्याप्रमाणात दहशतवादी शिबिरे आणि लाँच पॅडमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एलओसी पार करून सर्जिकल स्ट्राइक केलेल्या आठ सैनिकांना गुरूवारी उत्तर मुख्यालयात शौर्य चक्र आणि सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. यातील बहुतांश प्रयत्न फसले. अशा परिस्थितीला योग्यरितीने सामोरे जात आहोत. खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असून वाद सोडवला असल्याचे ते म्हणाले. पूर्व लडाखप्रश्नी चर्चा करण्यासाठी एका हॉटलाइन सुरू आहे. बैठकाही घेतल्या जात आहेत. परंतु, तिथे डोकलामसारखी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.