शीना बोरा हत्याकांड प्रकरणी एक नवा खुलासा समोर आला आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्यातील मोबाइलवरील संभाषण माध्यमांच्या हाती लागले आहे. इंद्राणी आणि पीटरने शीनाच्या खुनाची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचे या संभाषणातून दिसून येते. सुमारे २० ऑडिओ क्लिप माध्यमांच्या हाती लागले असून सीबीआयने यातील काही क्लिप पुराव्यासाठी आपल्या ताब्यात घेतले आहेत. या क्लिपमुळे पीटर मुखर्जी याचाही या हत्याप्रकरणात हात असल्याचे दिसून येते.
एका ऑडिओ क्लिपमध्ये राहुलने वडील पीटर यांना शीनाबाबत विचारणा केली असता, पीटर यांनी मला तिची काहीही माहिती नसल्याचे म्हटले. शीना इंद्राणीला अखेरची कधी भेटली होती, असेही राहुलने विचारले. परंतु पीटरने थेट उत्तर न देता तुला जे काही करायचे ते कर असे म्हणत गोव्याला येऊन भेटण्याचा सल्ला त्याला दिला. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.
राहुलनेच हे संभाषण रेकॉर्डिंग केले असून शीनाच्या हत्येनंतर झालेल्या दोन आठवड्यातील हा घटनाक्रम आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये शीना बेपत्ता असल्याने राहुलने पीटरसमोर चिंता व्यक्त केली होती. शीना ऑफिसला नियमित जात असत. ती कधीही गैरहजर राहत नाही. पण ती बेपत्ता असल्यामुळे मला काळजी वाटते, असे तो पीटरला म्हणाला. परंतु पीटरने यावर काहीही उत्तर दिले नाही.
राहुल आणि इंद्राणी यांच्यातही मोबाइलवर संभाषण झाले होते. त्यात शीनाच्या कंपनीतील एचआरशी आपण बोलले असून ती सुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले, असे इंद्राणीने राहुलला सांगितले. शीनाबाबत माहिती मिळताच पोलीस कळवतील, असेही ती म्हणाली.
२४ एप्रिल २०१२ पासून शीना बेपत्ता होती. त्यानंतर २५ ऑगस्ट २०१५ रोजी शीनाची हत्या केल्याप्रकरणी इंद्राणीला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही या प्रकरणी अटक झाली होती.