सरकारी सेवांमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही समतोल राखण्यासाठी महिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आपल्या परीक्षांच्या जाहिरातीत स्पष्ट केली आहे.
आयोगातर्फे २०१५ साली घेण्यात येणाऱ्या लोकसेवा पूर्वपरीक्षेसाठी नुकतीच नोटीस जाहीर करण्यात आली. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा (आयएएस, आयएफएस, आयपीएस व अन्य सेवा) पूर्वपरीक्षांसाठी २३ मे ते १९ जूनपर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. यंदा यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या वन खात्यासाठीच्या (फॉरेस्ट सव्‍‌र्हिस) परीक्षेसाठीही लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या बरोबरच ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. तसेच वन खात्यासाठीही सुरुवातीची चाचणी परीक्षा होणार आहे.
या परीक्षांसाठी अधिकाधिक महिला उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि यशस्वी होऊन सरकारी सेवांमध्ये यावे, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. सरकारी सेवांमध्ये पुरुष व महिलांमध्ये जी दरी आहे ती भरून काढणे हा यामागील उद्देश आहे. २०१०, २०११ आणि २०१२ साली झालेल्या आयोगाच्या परीक्षांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली होती.

पाकिस्तानात ख्रिश्चनांवर हल्ला
लाहोर : ख्रिश्चनांच्या घरांची लूट करून चर्चची मोडतोड केल्याप्रकरणी पाकिस्तानात ४० जणांना अटक करण्यात आली असून अन्य ५०० जणांना दहशतवादाच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे.एका ख्रिश्चन युवकाने ईश्वरनिंदा केल्याचे वृत्त पसरल्याने सोमवारी संतप्त जमावाने ख्रिश्चन समाजाच्या घरांवर हल्ला चढवून लुटालूट केली आणि चर्चला आग लावण्याचा प्रयत्न केला.

अफगाणिस्तानात २६ ठार
कंदहार : तालिबानी बंदूकधाऱ्यांनी दक्षिणेकडील हेल्मंड प्रांतात पोलिसांच्या मुख्यालयास वेढा घातला असून त्यात आतापर्यंत १९ पोलिस व सात सैनिक ठार झाले आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. नवाझाद जिल्ह्य़ाचे पोलिस प्रमुख नपास खान यांनी सांगितले, की अतिरेक्यांनी परिसरात २० मीटर आतमध्ये प्रवेश केला, नंतर त्यांनी पोलिसांची वाहने व शस्त्रे ताब्यात घेऊन नवाझाद येथून बाहेर जाणारा रस्ता बंद केला. सरकारकडून आम्हाला प्रतिसाद हवा आहे, असे खान यांनी सांगितले.