गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे, हे वास्तव आता सर्वानीच मान्य केले आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, कामातील बदल, झोपेचे बिघडलेले गणित अशा अनेक कारणांमुळे हृदयावरील ताण अधिकच वाढतो. कधी कधी अगदीच सामान्य वाटत असलेली सवयही हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.

टीव्ही पाहणे
सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत सतत काम केल्यानंतर विरंगुळा म्हणून झोपेपर्यंत टीव्हीसमोर बसणे ही आता बहुसंख्य जणांची सवय झाली आहे. मात्र टीव्ही पाहणे हे आपल्याला हृदयविकाराच्या जवळ घेऊन जाणारे असू शकते. आधीच कार्यालयातील खुर्चीवर आठ-दहा तास बसल्यानंतर पुन्हा टीव्हीसमोर चार तास बसून राहणे धोकादायक आहे.

ताणाकडे दुर्लक्ष करणे
सतत येणारा ताण, नराश्य याकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यांनाच कमी-अधिक तणावाला नित्यनेमाने सामोरे जावे लागते. त्याविषयी बोला, मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. अन्यथा मनाच्या एका कोपऱ्यात त्याविषयी सतत चिंता सुरू असते. ती घातक ठरते.

घोरणे
झोपेत घोरणे ही सर्वसामान्य सवय आहे. त्यामागे कोणतेही गंभीर कारण नसते. मात्र यामुळे तुमची झोपमोड होत असेल तर त्याकडे लक्ष द्या. घोरताना काही वेळा रक्तदाब वाढतो. त्याचाही परिणाम हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिनीवर पडू शकतो.

मद्याचा अतिरेक
ताण कमी करण्यासाठी, बरे वाटावे म्हणून, सेलिब्रेशनसाठी मद्याचा एकच प्याला घेणे आता दुर्मीळ राहिलेले नाही. मद्याचा अतिरेक तर होत नाही ना, याचा विचार करा. ताण कमी करण्यासाठी खरंच याचा उपयोग होतो का, आजारापेक्षा हा उपाय अधिक त्रासदायी ठरणार नाही ना, याचा विचार करा.

सतत खात राहणे
समोर आले म्हणून, वेळ जात नाही, ताण आहे.. अतिरिक्त खाण्यासाठी अनेक कारणे आहेत. मात्र जास्त खाण्यामुळे अतिलठ्ठपणा, त्यासोबत उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशी आजारांची साखळी तयार होत राहते. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा.

धूम्रपान टाळा
सिगारेट ओढणे हे स्वत:साठीच नाही तर समोरच्या व्यक्तीसाठीही हानीकारक आहे. त्यामुळे तुम्ही सिगारेट ओढत नसलात तरी अशा मित्रांच्या संगतीत राहणेही टाळा. सिगारेट ओढणे कितीही स्मार्ट वाटत असले तरी ते व्यसन आहे.

भाज्या आणि फळे टाळणे
श्रावण कधी एकदा संपतो याचे अनेकांना वेध लागले आहेत. मात्र भाज्या आणि फळांचा आहार शरीराला पोषक असतो. त्याची चव आवडली नाही तरी. मसालेदार, तेलकट आणि पचनाला जड असलेले पदार्थ जिभेसाठी कितीही चांगले असले तरी एकदा का ते गळ्याखाली उतरले की त्याला कोणतीही चव राहत नाही. पाच-दहा मिनिटांच्या चवीसाठी शरीराला किती त्रास द्यायचा, त्याचा विचार करायला हवा.

मिठाचा अतिरेक
मिठामुळे पदार्थाला चव येते, हे अगदी खरे. मात्र मिठातील सोडिअम शरीरासाठी हानीकारक असतो. अतिरिक्त मिठामुळे रक्तदाब वाढतो. त्याचा रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो. मीठ पूर्ण वज्र्य करणे योग्य नाही. मात्र त्याचा वापर करताना हात आखडता घेतलेलाच बरा.