तांदुळजाची ‘शास्त्रीय’ पाककृती वर्णन केल्यानंतर, आजीने तिचा स्टीलचा डबलडेकर डबा उघडला आणि आतमधली नाचणीची भाकरी, पालेभाजी आणि लसूण चटणी दाखवली. म्हणाली, ‘‘हेच आमचं रोजचं खाणं. एक सांगू का, आता माझं इतकं वय झालंय, आजी ऐंशीच्या पुढच्या असाव्यात, पण एकदा सुदिक डाग्तरकडे गेलेली न्हाई..’’

सोशल मीडियाचा वाढता वापर, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे (सनातन) सत्य पुन्हा सिद्ध करत आहे. तसं म्हटलं तर बहुतेक प्राणीही कळपातच राहतात. कळपाचे म्हणून जे काही अलिखित नियम असतात ते पाळताना ते दिसतात. उदाहरणार्थ, शक्यतो ते त्यांचा प्रांत सोडून जात नाहीत. रस्त्यावरची भटकी कुत्रीसुद्धा त्यांचा परिसर सोडून जात नाहीत. बघा ना, संध्याकाळच्या वेळी एकाच झाडावर एकाच प्रकारचे पक्षी एकत्र बसलेले दिसतात. पण मनुष्यप्राणी वेगळा आहे. त्याला निसर्गाकडून बुद्धीचं वरदान मिळालं आहे. एकाच ठिकाणी किंवा एकाच गोष्टीमध्ये त्याचं मन फार काळ रमत नाही. तोच-तोचपणा त्याला नकोसा वाटतो. थोडं रुटिन सुरू झालं की ‘चेंज इज मस्ट’ वाटायला लागतं. मग दुसरी नोकरी, नवीन मोबाइल, लेटेस्ट फॅशन, नवीन हॉलिडे डेस्टिनेशन अशा एक-ना-अनेक बदलांच्या तो शोधात असतो. एक प्रकारे नवीनपणातून जणू त्याला सबंध जगाशीच संबंध जोडायचा असतो म्हणा ना!
पण आजकाल घरात बसूनही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि अशाच अनेक सुविधांद्वारे जगातल्या हजारो व्यक्तींबरोबर त्याला संबंध ठेवता येतो. फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप हाच बऱ्याच जणांसाठी समाज झाला आहे. त्या कळपाचा पहिला अलिखित नियम म्हणजे नेटवर सदैव ‘जागे’ राहणे. पूर्वी सकाळी उठल्यावर तोंड धुऊन देवाला नमस्कार करून दिवसाची प्रसन्न सुरुवात होत असे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ या प्रार्थनेने दिवसाच्या कामाला उत्साहाने सुरुवात करावीशी वाटे. आता उठल्यावर तोंड धुवायच्या आधी मोबाइल महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांचा काय संदेश आहे किंवा आहेत ते प्रथम पाहायचं. त्यांना चार्जिगचा नैवेद्य दाखवायचा आणि मग सूर्य उगवला असं समजायचं. मग लाइक करणं, फॉरवर्ड करणं इत्यादी आन्हिकं उरकायची. एक वेळ समोर दिसणारा प्रत्यक्ष माणूस खोटा वाटेल पण न पाहिलेला नेटवरचा खोटा माणूस या समाजामध्ये खरा मानला जातो. असो.
हे सगळं कशावरून निघालं, तर परवा एक आजी, तुळसाक्का भेटल्या. आम्हा दोघींकडेही मोबाइल नव्हता. व्हॉट्सअ‍ॅपचा प्रश्नच नव्हता, तरीपण आम्ही एकमेकींशी गप्पा मारल्या. मग त्या खऱ्या की खोटय़ा? सेल्फी नाही की रेकॉर्डिग नाही. म्हणजे काही ‘प्रूफ’ नाही. पण मनात मात्र ती भेट कोरली गेली. त्याचं असं झालं.. रविवारचा दिवस. म्हणजे सकाळी सगळीकडे तशी सामसूमच. पण आमच्या जवळचा भाजी बाजार लवकर भरतो. आसपासच्या खेडय़ांतून ताजी भाजी घेऊन लोक पहाटेच येतात. कारण खूप उन्हं व्हायच्या आत माल विकून त्यांना घरी परत जायचं असतं. हा रविवारचा भाजी बाजार एकाच फुटपाथच्या दोन्ही बाजूला भरतो. मी भाज्या पाहत चालले होते. ताज्या भाज्या आणि फळं पाहत राहणं मला फार आवडतं. तेवढय़ात माझं लक्ष एका टोपलीने वेधून घेतलं. त्यामध्ये कांदे होते. विकणाऱ्या आजीबाईंकडे पाहिलं आणि विचारलं.
‘‘काय आजी, कांदे कसे दिले?’’
‘‘पंचवीस रुपये किलो.’’
खेडय़ातलं आणि त्यातल्या त्यात म्हातारं माणूस असलं की मी कधीही ‘स्वस्त नाही देणार का?’ किंवा ‘कमी करा ना!’ असा भाव करत नाही.
‘‘किती देऊ?’’ आजी.
‘‘एक किलो द्या.’’ मी.
कांदे निवडून घेण्यासाठी मी खाली बसले. पण आजी त्या कांद्यांकडे अगदी पोटच्या पोराप्रमाणे पाहत होत्या. ‘‘निवडून घ्यायलाच नको. बघ, सगळे कांदे कसे लाडूवानी एकसारखे हायेत. मी सोता हाताने वाळवल्यात. कोनचेबी घ्या!’’
मी मनात म्हटलं, ‘काय हा सुंदर प्रोफेशनल प्राइड!’ अनेक पदव्या घेऊन पाटय़ा टाकणारे आणि पगारवाढीकडेच लक्ष असणारे ‘व्हाइट कॉलर लेबर’ माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. जिला आपण शेतातून काढलेले कांदे ‘लाडूवानी’ वाटतात त्या आजींकडे मी पाहातच राहिले. नीट पाहिल्यावर मलासुद्धा ते लाडूवानी एकसारखे दिसले. वजन झाल्यावर मी कांदे माझ्या पिशवीत टाकले. तेवढय़ात आजी म्हणाल्या, ‘‘ही भाजी घेता का?’’
‘‘कसली भाजी आहे ही?’’
‘‘तांदुळजा म्हणतात हिला.’’
‘‘ओह! तांदुळजा नाव ऐकलंय. अशी असते होय?’’ मी थांबून म्हणाले, ‘‘पण निवडायची कशी?’’
‘‘मी दावते ना! हे बघ.. अशी’’ आजींनी दोन देठ एकत्र घेऊन तोडायचे कसे ते दाखवले. पण मला ते प्रकरण जरा अवघडच वाटलं. म्हणून सहजच म्हटलं, ‘‘हे फारच किचकट आहे. निवडलेली असती तर घेतली असती.’’
‘‘मी निवडून देते ना!’’
‘‘खरंच?’’
‘‘हां. मग? जरा मला पाच-दहा मिंटं द्या. मी निवडून ठिवते.’’
मी आजींना कांद्याचे पंचवीसच्या ऐवजी तीस रुपये दिले (त्यांना खात्री वाटावी म्हणून) आणि म्हटलं, ‘‘हे पैसे ठेवा. मी येते दहा मिनिटात. भाजी निवडून ठेवा तोपर्यंत. चालेल?’’
‘‘व्हय. व्हय. या.’’
मी बाकीच्या भाज्या आणि फळं घेऊन आले. आजींचं निवडणं चालूच होतं. मग मीही त्यांच्यासमोर बसून तांदुळजा निवडू लागले.
भाजी निवडता निवडता आमच्या गप्पा रंगल्या. कुणीही कुणाला ‘फ्रेंड्स रिक्वेस्ट’ केली नव्हती. ‘दोन माणसं’ इतकं पुरेसं होतं. फेस-टू-फेस, हार्ट टू हार्ट. समोरासमोर असलं की डोळ्यात बघणं होतं. आत असेल तेच बाहेर येतं.
‘‘आजी, भाजी निवडून होतीये. पण करायची कशी?’’
‘‘सोपं हाय. ही भाजी करायच्या अदुगर धुवायची. मग मोठी मोठी चिरायची. आणि एका पातेल्यात पानी घालून पाच मिंटं शिजवायची. हे हुईपर्यंत एक कांदा चिरायचा. थोडा लसूण ठेचायचा. मग जराशा तेलावर मोहरी घालून कांदा टाकायचा. ही भाजी (पाणी काढून घेऊन) त्यावर टाकायची. मग जराशी मिरची, मीठ आणि लसूण टाकून जरासं हलवायचं आणि झाकायचं आणि चुलीवरून खाली काढायची. आणि खायची आपली भाकरीबरोबर.’’
भरपूर तेल, बटर आणि क्रीम किंवा चीज आणि मसाले टाकून केलेलं माझं पाककर्म माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं. आजी सांगू लागली. ‘‘पन लक्ष्यात ठिव. ते बाजूला काढलेलं पानी टाकायचं न्हाई.’’
‘‘त्याचं काय करू आजी?’’
‘‘म्हणजे काय? त्याच्यातच भाकरी करायची. डायबेटीला (‘डायबेटीस’च आजींनी केलेलं मराठी रूपांतर) लई चांगलं असतंय. आपन करतो काय, हे असलं खायचं सोडून डाग्तरकडच्या गोळ्या खातो. आता काय म्हणायचं या लोकान्ला?’’
होलिस्टिक हेल्थ प्रॅक्टिसचा एक भाग न्यूट्रिशन असल्याने न्यूट्रिशनिस्टच्या चष्म्यातून मी आजीच्या पाककृतीकडे पाहिलं- त्यातली प्रत्येक पायरीन् पायरी, शब्दन् शब्द माझ्या हृदयाला भिडत गेला. खरंच, तिची ही पाककृती किती शास्त्रीय होती. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुणी तरी ही पालेभाजी घेतंय म्हटल्यावर ती निवडून द्यायला, पाककृती सांगायला आणि तिचे गुणधर्म सांगायला ती तत्पर होती. भाजीच्या पाककृतीमध्ये प्रथम ती धुणं व मग चिरणं (बरेच जण नेमकं उलट करतात), तीसुद्धा मोठी चिरणं (बारीक चिरल्याने त्यातले पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात), लसूण फोडणीत न टाकता वरून टाकणं या सर्व गोष्टी अत्यंत शास्त्रीय होत्या. हे ऐकल्यावर मला आजीशी गप्पा मारण्याची लहर आली. मी तिला म्हटलं, ‘‘खरंय आजी, तुम्ही म्हणताय ते. पूर्वी नाही का खेडय़ातली माणसं शेतात राबत? दुपारी बाया-माणसं झाडाखाली एकत्र येत. फडक्यात बांधून आणलेली भाकरी, पालेभाजी, लसणाची चटणी आणि कांदा असं खात. थोडीशी विश्रांती घेत आणि परत कामाला लागत.’’
माझं म्हणणं ऐकल्यावर, आजीने मला तिचा स्टीलचा डबलडेकर डबा दाखवला. तो उघडला आणि आतमधली नाचणीची भाकरी, पालेभाजी आणि लसूण चटणी दाखवली. म्हणाली, ‘‘हेच आमचं रोजचं खाणं. एक सांगू का, आता माझं इतकं वय झालंय (आजी ऐंशीच्या पुढच्या असाव्यात), पण एकदासुदिक डाग्तरकडे गेलेली न्हाई. पांडुरंगाच्या किरपेनं सगळं बरं चाललंय. असंच एक दिस त्याच्याकडे जायचं.’’
‘‘तोपर्यंत काय करायचं, आजी?’’
‘‘तोपर्यंत असं काम करत ऱ्हायचं. बघ की. मी सकाळी चारला घरनं निघाले. शेतातच घर हाये. आणि आमची ही माणसं हायेत. (शेजारी बसलेल्या काही भाजीवाल्यांकडे तिने बोट दाखवलं). तेंच्याबरोबर हितं यायचं आणि भाजी विकायची. शेतात काम करायचं.’’
हा फेस-टू-फेस लुक (बुक नव्हे) मला काही वेगळंच शिकवून गेला. मला अंतर्मुख करून गेला. साधेपणातला आनंद देऊन गेला. माझ्याकडे पाहूनच मी तिचं म्हणणं ‘लाइक’ केल्याचं तिला कळलं. तेच आता तुमच्याबरोबर ‘शेअर’ करतीय आणि आजीच्या अनुभवाला, तत्त्वज्ञानाला ‘फॉलो’ करायची ‘रिक्वेस्ट’ पाठवतेय.
health.myright@gmail.com

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!