ओटीबोल्टच्या १४ जागतिक पदकांची बरोबरी

अमेरिकेची महान धावपटू अ‍ॅलीसन फेलिक्सला ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळवता आले. परंतु तिने जमैकाच्या मरलिन ओटी आणि उसेन बोल्ट यांच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेतील १४ पदकांच्या विक्रमाची बरोबरी साधली.

फेलिक्सने आतापर्यंत सहा सुवर्णपदकांसह नऊ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. जागतिक स्पध्रेतील १४ पदकांमध्ये नऊ सुवर्णपदका समावेश आहे. तसेच एकंद१२ पदके त्याने अमेरिकेच्या रिले संघासाठी मिळवली आहेत.

जमैकाच्या बोल्टला आठवडय़ाअखेरीस होणाऱ्या ४ बाय १०० मीटर शर्यतीत पदकांची संख्या फक्त १५पर्यंत वाढवण्याची संधी आहे. परंतु फेलिक्स ४ बाय १०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर अशा दोन शर्यतींमध्ये सहभागी होणार असल्यामुळे ती पदकांची आकडेवारी १६पर्यंत उंचावू शकेल.

बुधवारी झालेल्या ४०० मीटर शर्यतीत बहामाची खेळाडू आणि शर्यतीमधील आघाडीवीर शॉनाई मिलर-उयबो विजयरेषेपासून २० मीटर अंतरावर अडखडळल्यामुळे फेलिक्सला कांस्यपदकावर नाव कोरता आले. मुसळधार पावसात झालेल्या या शर्यतीत तिची सहकारी फिलिस फ्रान्सिसने सुवर्णपदक जिंकून सर्वानाच चकित केले. बहरिनच्या साल्वा ईड नासीरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

‘‘एक सुवर्णपदक हुकल्यामुळे अतिशय खंत वाटते आहे. परंतु स्पर्धा अद्याप संपलेली नाही. त्यामुळे मी आशावादी आहे,’’ असे फेलिक्सने सांगितले. २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर वर्षभराने हेलसिंकी येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेतील २०० मीटर प्रकारात तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.

‘‘प्रत्येक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकण्याच्याच ईष्रेने मी सहभागी होते. हेच ध्येय मी नेहमी जपले. त्यामुळे जेव्हा अपेक्षित कामगिरी होत नाही, तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे,’’ असे फेलिक्सने सांगितले.

 

लक्ष्मणनचे अंतिम फेरीचे लक्ष्य हुकले!

लंडन : गोविंदन लक्ष्मणन याने वैयक्तिकदृष्टय़ा सर्वोत्तम कामगिरी साकारली, परंतु जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेतील पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही.

२७ वर्षीय लक्ष्मणनने १३ मिनिटे आणि ३५.६९ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. १३ मि. ३६.६२ सेकंद ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वेळ होती. यापेक्षा एका सेकंदाने त्याने कामगिरी सुधारली. मात्र पहिल्याच फेरीच्या शर्यतीत त्याला १५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत गतविजेत्या मो फराहचाही (ग्रेट ब्रिटन) समावेश होता.

दोन्ही शर्यतींमधील अव्वल पाच आणि त्यानंतर वेगाने शर्यत पूर्ण करणारे पाच धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. सर्वसाधारणपणे लक्ष्मणनचा ३१वा क्रमांक आला. आतापर्यंत या स्पध्रेत एकमेव लक्ष्मणनने वैयक्तिक कामगिरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी साकारली आहे. ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या या शर्यतीच्या वेळी अविरत पाऊस सुरू होता. तापमानसुद्धा १५ अंश सेल्सियसपेक्षा कमी होते.

‘‘मी प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत सहभागी झालो. राष्ट्रीय विक्रम मोडण्याचे माझे उद्दिष्ट होते. दुर्दैवाने त्यात मी अपयशी ठरलो. परंतु किमान सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करू शकलो. अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्यामुळे निराश झालेलो नाही, कारण मी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मी यापुढेही चांगली मेहनत करीन

आणि राष्ट्रीय विक्रम मोडेन,’’ असा विश्वास लक्ष्मणनने व्यक्त केला. १९९२ मध्ये बहादूर प्रसाद यांनी १३ मि. २९.७० से. असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

 

२०० मीटर शर्यतीची अंतिम फेरी गाठल्यानंतर मकवाला संतप्त

लंडन : बोत्स्वानाच्या इसाक मकवालाने २०० मीटरच्या दोन फेऱ्यांचे आव्हान पेलत जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेची अंतिम फेरी गाठली. परंतु संतापलेला मकवाला आपले नैराश्य लपवू शकला नाही.

संसर्गजन्य आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मकवाला याला शर्यतीत भाग घेण्यास मनाई केली होती. एवढेच नव्हे तर ट्रॅकपासूनही दूर राहायला सांगण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी झालेल्या २०० मीटर शर्यतीची प्राथमिक फेरी आणि ४०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत तो सहभागी होऊ शकला नाही. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याला विजनवास संपुष्टात आला. त्यानंतर जागतिक अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रातील वेगवान धावपटू असे बिरुद मिरवणाऱ्या मकवालाने उपांत्य फेरीचा अडथळाही ओलांडला. दुसऱ्या क्रमांकासह शर्यत पूर्ण केल्यानंतर त्याने आपले दोन्ही हात उंचावले आणि चाहत्यांना अभिवादन केले.

‘‘निराशेसोबतच मी अद्याप धावतो आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मला ४०० मीटर शर्यतीसंदर्भातील अनुकूल निर्णय द्यावा. मी धावण्यासाठी सज्ज आहे. मला माहीत नाही कोणी हा निर्णय दिला,’’ असे मकवालाने सांगितले.

त्याआधी २०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीसाठी २०.५३ सेकंद अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. ती वेळ मकवालासाठी घेण्यात आलेल्या वेळेवर आधारित शर्यतीत सहज पार केली.

मंगळवारी झालेल्या ४०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत मकवाला भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. मकवाला नसल्यामुळे वेयदे व्हान निकेर्कचा सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा झाला. याबाबत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडे बोत्स्वाना अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दाद मागून तो शर्यतीत सहभागी होण्याइतपत तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. याबाबत मकवालाने आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि यजमान संघटनेवर टीकेची झोड उठवली.