आंतरराष्ट्रीय स्तरावर लागोपाठ दोन सुपर सीरिज बॅडमिंटनमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या किदम्बी श्रीकांतला आता जागतिक स्पर्धेतील अजिंक्यपद खुणावत आहे. हे स्वप्न साकार करीन, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

श्रीकांतने इंडोनेशियन स्पर्धेपाठोपाठ ऑस्ट्रेलियन स्पर्धाजिंकून जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर पुन्हा झेप घेतली आहे. ऑगस्टमध्ये जागतिक स्पर्धा होणार असल्यामुळे त्याच्याबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. याबाबत तो म्हणाला, ‘‘जागतिक क्रमवारीत पुन्हा दहाव्या स्थानावर पोहोचल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. जागतिक स्पर्धेत अव्वल स्थान घेण्याबाबत माझ्याकडे भरपूर अनुभव मिळाला आहे. यंदाच्या मोसमात माझ्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत आहे. जगज्जेतेपद मिळवणे सोपे नसले तरी अशक्य नाही, हे माहीत असल्यामुळे तेथे पोहोचण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. गेले दोन आठवडे केवळ माझ्यासाठी नव्हे तर भारतासाठी सोनेरी यश मिळवणारे ठरले आहे. एच.एस.प्रणॉय व बी.साईप्रणीत यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यामुळे बॅडमिंटनमध्ये आपल्या देशाचा नावलौकिक उंचावला आहे.’’

‘‘च्योंग वेई व चेन लोंगसारख्या जगज्जेत्या खेळाडूंवर प्रणॉयने मात केल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याचा पराभव झाल्यामुळे मला वाईट वाटले,’’ असेही श्रीकांतने सांगितले.

ऑलिम्पिकनंतर श्रीकांतच्या उजव्या घोटय़ाला दुखापत झाली होती व त्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. या दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर श्रीकांतने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.