गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

वय वाढलं तरी बालिश हरकती करणाऱ्या व्यक्ती जागोजागी दिसतात. अशा बालिशपणाचा अनेकांना त्रास होतो आणि त्यातून त्यांच्याबद्दल राग निर्माण होतो. मात्र वय वाढलं तरी आपल्यातली निरागसता लहान मुलाइतकीच ठेवणाऱ्या व्यक्तींविषयी आपले मत तितके वाईट नसते. उलट अशा व्यक्तींनी आपल्यातलं निरागस लहान मूल वाढवू देऊ नये, अशी आपली इच्छा राहते. भारतीय चित्रपटातले नायक एका वेळी १०० जणांना हाणामारीत पुरून उरणारे असले, तरी नायिकेच्या आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने कायम निरागस मनाचे राहतील याची तजवीज केलेली असते. अमेरिकी आणि ब्रिटिश चित्रपटही याला अपवाद नसले, तरी किमान बाळबोधपणा असेल, याची काळजी तेथे घेतली जाते. जगभरातल्या सर्वच देशांत नायकाला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता घेतली जाते. त्याच्या निरागसतेचे दाखले म्हणून त्याच्या हातून मानव जातीच्या भल्यासाठीचे कृत्य घडविले जाते. यू टय़ुब आल्यानंतर सुरुवातीला त्यावर अभिजात चित्रपट अपलोड करणारे चित्रप्रेमी बक्कळ होते. काही काळानंतर कॉपीराइटच्या प्रश्नावर चित्रपट अपलोडीकरणावर मर्यादा आल्या. पण चित्रपटांमधील लाडक्या क्षणांचे तुकडे यू टय़ुबवर टाकण्याचा ट्रेण्ड जोमाने यायला लागला. ट्रेलरहून मोठे पण ट्रेलर नसलेले आजच्या लेखातील तुकडे मोठय़ांमधील निरागसतेने ओतप्रोत भरलेले आहेत. पहिला क्लिपचा तुकडा आहे ‘रशमोर’ या चित्रपटामधला. या चित्रपटामध्ये दोन भिन्न वयाचे मित्र एकमेकांचे शत्रू झाल्यानंतर कोणत्या बालिश पातळीवर युद्ध खेळतात ते आले आहे. जेसन श्वार्ट्झमन आणि बिल मरे हे दोन कलाकार यात आहेत. हॉटेलातील बिल मरेच्या रूममध्ये मधमाशा सोडणाऱ्या श्वार्ट्झमनची लाडकी सायकल मरे दुसऱ्या दृश्यामध्ये तोडतो. तिसऱ्या दृश्यात श्वार्ट्झमन मरेच्या गाडीचे ब्रेक काढून ठेवतो. चौथ्या दृश्यात मरे श्वार्ट्झमनला तुरुंगाची हवा दाखवितो. शाळेतल्या विद्यार्थ्यांची आणि एका उद्योगपतीची ही तुल्यबळ नसलेली लढाई ‘यू आर फरगिवन’ शब्दांच्या प्रसंगाला अगदीच विरोधाभासी गाण्याने सुरू राहते. एखाद्या एमटीव्हीच्या सुंदर व्हिडीओसारखे या तुकडय़ाचे चित्रण झाले आहे. या छोटय़ाशा गाण्यावरून देखील चित्रपटातील गमतीची कल्पना येऊ शकते. चित्रपट पाहाच, पण तो लवकर उपलब्ध होत नसल्यास या क्लिपकडे जा.

दुसरा तुकडा आहे ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटामधील धावण्याचा. यातील नायक असलेल्या टॉम हँक्सने वठविलेल्या निरागस व्यक्तिरेखेद्वारे त्या वर्षीची सगळीच चित्रपट पारितोषिके पटकावली होती. मेंदू कमी विकसित झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे पाहताना निखळ दृष्टी ठेवत असल्याने त्याच्याकडून अनेक पराक्रम या चित्रपटात होताना दाखविले गेले आहेत. चित्रपटात कथानकाच्या एका विशिष्ट टप्प्यावर त्याला दु:ख होते. तो दु:खाला कवटाळून बसत नाही. निव्वळ धावत राहतो. धावण्याचा जागतिक विक्रम नकळत घडविल्यानंतर शांत होतो.अतिव दु:खाला मारणारा हा उपाय आणि त्या प्रसंगातला अभिनय पाहायलाच हवा. या चित्रपटातील नायकाचे निवेदन आणि त्याच्या लहानपणाचा एक हळवा किस्सा दाखविणारा तुकडाही इथे जोडला आहे.

तिसरी क्लिप आहे जपानी दिग्दर्शक तकाशी किटानो यांच्या सोनाटिन या चित्रपटातील. किटानोचे गँगस्टरपटही कलात्मक सिनेमांमध्ये मोडतात. लोकप्रिय मारधाड वज्र्य असलेल्या या चित्रपटातील ननायक सुट्टीवर एका समुद्र किनारी आलेले असतात. खून-मारधाडीला कंटाळून अतिसाधे आयुष्य जगताना ते काय करू शकतील, या संकल्पनेवर हा चित्रपट आधारलेला आहे.

यातल्या नायकाला ते राहत असलेल्या रिसॉर्टवर कागदी घोडे नाचविण्याचा लहान मुलांचा खेळ सापडतो. आधी बॉस आपल्यासोबत हा खेळ खेळतोय पाहून त्याचे पंटर चक्रावतात. पण नंतर या खेळाचे विस्तारित स्वरूप समुद्रकिनारी सुरू राहते. गँगस्टर ननायक आपल्या पंटर्सना तेथे घोडे बनवितो आणि तालावर नाचायला लावतो. खऱ्याखुऱ्या माणसांचा हा काही मिनिटे चालणारा खेळ वाचून, ऐकून आनंद मिळणार नाही. या दृश्यातील चित्रसंगती, वेग, सूर्यप्रकाशाचा बदलत जाणारा रंग आणि समर्पक संगीत यांची अनुभूती खूप सुंदर काहीतरी पाहिल्याचे समाधान मिळवून देईल.

शेवटची क्लिप आहे, हाँगकाँगचा दिग्दर्शक जॉनी टो याच्या मिशन चित्रपटातली. एका गँगस्टरच्या सुरक्षेसाठी असलेला मारधाडीत निष्णात असलेल्या व्यक्तींचा समूह या क्लिपमध्ये बॉसची वाट पाहत कंटाळलेला आहे. क्लिपला सुरुवात होते, कंटाळा पळविण्याच्या त्यांच्या क्लृप्तीने. एका कागदी बोळ्याला फुटबॉलसारखे खेळवण्यात ते रमून जातात. मोठय़ा माणसांमध्ये बालिशपणा आणि निरागसता कायम असतेच. त्याचा देखावा मात्र चित्रपटांमधून कौशल्याने सादर होतो. असे चांगले देखावे मनात घर मात्र नक्कीच करतात.

https://www.youtube.com/watch?v=sL-kvgOGmzc

https://www.youtube.com/watch?v=nAfKFy9ZgHQ

https://www.youtube.com/watch?v=5B5BLcLGN1w

https://www.youtube.com/watch?v=QgnJ8GpsBG8

viva@expressindia.com