आसनगाव परिसरातील परिवार गार्डन हॉटेलसमोर स्कुटीवरील नीलेश महाजन या तरूणाचा गुरूवारी सकाळी कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पाच तास मुंबई-नाशिक महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
घरातील विवाहानिमित्त पूजेचे साहित्य आणण्यासाठी तो स्कुटीवरून महामार्ग ओलांडत असताना त्याला मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. त्यात त्याचा  मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांनी  महामार्गावर रास्ता रोको केला.  अपघात झालेल्या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून भुयारी मार्गाचे काम सुरू करावे, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे, शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी, आदींनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.