मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी स्थितीबाबत सरकार असंवेदनशील असून, दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
निलंगा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र व राज्यातील भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे त्यांच्या व्यथा व समस्या राज्यकर्त्यांना समजत नाहीत. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर अनेक खोटेनाटे आरोप करून घोषणांचा पाऊस व खोटीनाटी आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली. परंतु सत्ता मिळाल्यानंतर कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. जनतेचा या सरकारबाबत भ्रमनिरास झाला आहे, असे सांगत केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील निलंगेकर, उपनगराध्यक्ष विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.
‘पक्षविरोधी काम करणाऱ्या
१५जणांवर कारवाई करावी’
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. बाजार समिती निवडणुकीत काहींनी पक्षाविरोधात भूमिका घेत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे पक्षविरोधी कार्य करणारे जि.प.चे माजी उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव पाटील, अॅड. जयश्री पाटील, हृषीकेश बद्दे, दिलीप पाटील नागराळकर आदींसह सुमारे १५जणांची नावानिशी तक्रार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. त्यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठी लवकरच कारवाई करतील, अशी अपेक्षा निलंगेकर यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपूर्वी जि.प.त काँग्रेसअंतर्गत गटबाजी करून निलंगेकर यांनी संभाजी पाटील यांना उपाध्यक्षपद दिले होते. त्याच पाटलांवर गद्दारी केल्याचा आरोप करण्याची वेळ निलंगेकरांवर आली आहे.