आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर आता भाजपाने आक्रमक भूमिक घेतली असून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. वडेट्टीवार यांचा दावा निराधार व तथ्यहीन असून त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे, असे भाजपाने या तक्रारीत म्हटले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाने वडेट्टीवार यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी वडेट्टीवार यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे. या पत्राबरोबर भाजपाने याप्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जोडल्याची माहिती आहे.

हेही वाचा – हेमंत करकरेंच्या मृत्यूप्रकरणी विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पाकिस्तान सरकारला…”

भाजपाने तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

२६/११ मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरणाचे सर्व पुरावे, साक्षी तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा दिली होती. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. उच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम ठेवली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे व न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असं भाजपाने या तक्रारीत म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते आहे. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात. तसेच अशी विधाने आपल्या सशस्त्र दलांच्या व पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे निवडणूक आयोगाने वडेट्टीवार यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?

“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.