पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावललेले खासदार राजेंद्र गावित कमालिचे नाराज असून त्यांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंद केले आहे. त्यामुळे रविवारी वसई विरारमध्ये गावित यांच्याशिवाय महायुतीचे उमेदावर हेमंत सावरा यांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, राजेंद्र गावित यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच त्यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
राजेंद्र गावितांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजेंद्र गावितांचा पुनर्प्रवेश झाला. २०१८ साली पालघरच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती झाली त्यावेळी शिवसेनेने पालघरची जागा मागितली. तसंच, त्यांनी उमेदवारासहित ही जागा मागितली. आम्ही राजेंद्र गावितांना विनंती केली की तुम्ही शिवेसनेच्या जागेवर उभे राहा. त्यांनी ती विनंती मान्य केली. राजेंद्र गावित शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. २०२२ मध्ये झालेल्या स्थित्यंतरात ते एकनाथ शिंदेंबरोबर राहिले.
हेही वाचा >> नाराज खासदार राजेंद्र गावित प्रचारापासून लांबच, वसईत हेमंत सावरा यांचा प्रचार सुरू
राजेंद्र गावितांंना महाराष्ट्रात अधिक स्कोप
पुढे ते म्हणाले, “आता २०२४ साली पालघर मतदारसंघाची जागा शिवेसनेला मिळाली. राजेंद्र गावितांबरोबर चर्चा झाली आणि पक्षाने निर्णय घेतला की राजेंद्र गावित यांचा उपयोग महाराष्ट्रात अधिक आहे. मंत्रीपदाचा अनुभव असल्याने त्यांचा फायदा महाराष्ट्राला अधिक करता येईल. खासदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं असलं तरीही महाराष्ट्रात त्यांना अधिक स्कोप आहे. कारण, महाराष्ट्रात त्यांचा अधिक संपर्क आहे. मंत्री राहिले असल्याने सरकारशी कनेक्ट आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या संमतीनेच आम्ही आमचे उमेदवार बदलले आणि डॉ.हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली.
“एकनाथ शिंदेंना आम्ही म्हणालो २०१९ मध्ये गावितांना तुम्हाला दिलं होतं, आता नवीन परिस्थितीत त्यांना पुन्हा भाजपात घ्यायचं आहे. या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिली. त्यानुसार आज डॉ.गावितांचा पुनर्प्रवेश होत आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राजेंद्र गावित का नाराज होते?
राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता होती. परंतु, महायुतीने डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजेंद्र गावित यांनी सावरा यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. ‘माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी मी प्रचारात नाही. मतदारसंघात काही दिवसांपूर्वी मी माझ्यासाठी मते मागत होतो आणि आता माझ्याऐवजी दुसर्याला मते द्या असे सांगणे मला जड जात आहे’, असे गावित म्हणाले होते. यावरून त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यांची नाराजी दूर करण्याकरता आता त्यांना विधानसभेचं वचन दिलं असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.