सेवाभावी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्य़ातील अविघटनशील कचरा स्वच्छ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जिल्हा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ देवरुख येथे करण्यात आला. देवरुख शहरातील स्वच्छता फेरीत सेवाभावी संस्थेचे सदस्य तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तहसील कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. शहर स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी सूक्ष्म नियोजन केले. शहर परिसराला बारा भागांत विभागून प्रत्येक भागाची जबाबदारी एका गटाकडे सोपविण्यात आली. प्रत्येक गटासोबत नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी देण्यात आले होते.
शहर बाजारपेठेत स्वत: जिल्हाधिकारी जाधव, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे, तहसीलदार सुकटे यांनी परिसर स्वच्छतेच्या कामात सहभाग घेतला. बाजारपेठेत फेरी मारताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना दुकानासमोर कचरा न करण्याचे आवाहन केले. बसस्थानकाला भेट देऊन त्यांनी स्थानक परिसरातील कचरा त्वरित हटविण्याच्या तसेच परिसरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाजी चौक, माणिक चौक, रोहिदास अळी, बौद्धवाडी पेट्रोलपंप, संगमेश्वर रोड, केशवसृष्टी आदी भागातील स्वच्छता फेरीत सहभागी होऊन जाधव यांनी नागरिकांचा उत्साह वाढविला. या फेरीदरम्यान गॅस एजन्सीजवळील प्लॅस्टिक कचरा आणि काचेच्या बाटल्यांचा ढीग स्वच्छ करण्यात आला. ठिकठिकाणी नाल्यांमध्ये तुंबलेला कचरा स्वच्छ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी राज्यमंत्री रवींद्र माने, युयुत्सु आर्ते, नीलेश चव्हाण, प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते. बैठकीस मार्गदर्शन करताना जाधव यांनी मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून ही मोहीम नागरिकांनी नागरिकांसाठी चालविलेली मोहीम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांचे असेच सहकार्य लाभल्यास जिल्ह्य़ात येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश राज्यभर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माने यांनी अभियानात सातत्य ठेवण्याची गरज स्पष्ट करताना या मोहिमेत राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे हजार विद्यार्थी सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. जिल्ह्य़ातील नागरिक स्वच्छताप्रिय आणि सुसंस्कृत असल्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.