नांदेडच्या भाजप नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

नांदेड महानगरपालिकेच्या मागील चार निवडणुकांत भाजपचे संख्याबळ घटत गेले तरी देशात आणि राज्यात भाजपची हवा लक्षात घेता यंदा कोणत्याही परिस्थितीत चांगले यश मिळाले पाहिजे, असे बजाविताना गटबाजी दूर ठेवून एकदिलाने काम करा, असा सज्जड दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.

नांदेड महानगरपालिका निवडणुकीची लगीनघाई पार पाडण्यासाठी भाजपने सारी शक्ती पणाला लावली आहे. यासाठी शहरातील एक मंगल कार्यालय महिनाभरासाठी भाड्याने घेतले आहे. ८१ जागांसाठी इच्छुक असलेल्या सुमारे ७०० इच्छुकांच्या मुलाखती गेल्या सोमवारी येथे घेण्यात आल्यानंतर निवडणूक समितीच्या वतीने मुख्यमंत्री व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे गुरुवारी संभाव्य उमेदवारांची नावे सादर करण्यात आली असून एका खासगी यंत्रणेचा अहवाल आणि प्रस्तावित नावे या साऱ्यांचा आढावा घेऊन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल.

भाजपचे निवडणूक प्रभारी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, महानगराध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, ओमप्रकाश पोकर्णा, चतन्यबापू देशमुख, डॉ.अजित गोपछडे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी   निवडणूक, संभाव्य उमेदवार आणि निवडणूक रणनीती इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा झाली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मागील चार निवडणुकांत काँग्रेसचे अव्वल स्थान कायम राखले असून, त्यांचे वर्चस्व मोडून भाजपची सत्ता आणली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

स्थानिक भाजपत अन्य पक्षांतून मोठय़ा संख्येने जोडल्या गेलेल्यांबद्दल, विशेषत आमदार प्रताप पाटील यांच्या पक्षातील सहभागाबद्दल धुसफुस दिसत असली तरी खासदार अशोक चव्हाण यांना जशास तसे उत्तर देण्याची चिखलीकरांची शैली, ओमप्रकाश पोकर्णा यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकला असल्याचे भाजपतील जुन्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी दुपारी ३ वाजता संपणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. भाजपत काही प्रभागांत, काही जागांवर मोठा पेच होता. स्थानिक मंडळींनी तो वरिष्ठांवर सोडला असून कोण कोणाचा, हे न बघता निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून प्रत्येक उमेदवार दिला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

* खा.अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या तीन आमदारांचे वास्तव्य असलेल्या शिवाजीनगर प्रभागात सशक्त उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

*  आमदार चिखलीकर यांचे पुतणे संदीप चिखलीकर यांच्यासह चिखलीकरांच्या सर्व समर्थकांना उमेदवारी.

* भाजपत भास्करराव खतगावकर यांच्या प्रभावाला ओहोटी. प्रकृती साथ देत नसल्याने खतगावकर  निवडणुकीपासून दूर.