इचलकरंजी येथील भरवस्तीत असणाऱ्या के. व्ही. पालनकर ज्वेलर्स या सोने-चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या दुकानावर मध्यरात्री धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी ११ किलो सोने, २८५ किलो चांदी व रोख दीड लाख रुपये असा मुद्देमाल लंपास केला. त्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये इतकी होते असे सांगण्यात आले. दरोडेखोरांनी वॉचमनला बांधून पिस्तुलाचा धाक दाखवला होता. शेजारी असलेल्या एका सराफी दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटय़ांचा प्रताप कैद झाला आहे, तर पालनकर ज्वेलर्सचे सीसीटीव्ही बंद होते.  
इचलकरंजीतील दाते मळा भागातील जुन्या मराठी मिलजवळ के. व्ही. पालनकर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे.  
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पाच ते सात दरोडेखोर पालनकर ज्वेलर्स जवळ आले. त्यातील बुरखाधारी तिघांनी वॉचमनच्या तोंडात कापडाचा बोळा घालून त्याचे हातपाय बांधले. दरोडेखोरांनी बनावट चावीने दुकानात प्रवेश केला. दुकानात असलेले कपाट, तिजोरी तसेच विक्रीसाठी मांडून ठेवण्यात आलेले सोन्या-चांदीचे सर्व प्रकारचे दागिने   लुटले .   हा प्रकार शेजारी असलेल्या पोतदार ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  दिवसभर पोलीस तपासामध्ये व्यग्र होते, तर शहराच्या मध्यवर्ती भागात दरोडा पडल्याने त्याची सराफांसह नागरिकांमध्ये शनिवारी चर्चा सुरू होती.