शहरातील मेनरोडवरील गणपती मंदिराच्या वतीने सोमवारपासून माघी गणेश जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा समारोप १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मेनरोडवरील या गणपती मंदिराला १२० वर्षांची परंपरा आहे. १८९१ मध्ये स्थापन झालेले मंदिर नाशिकच्या सांगीतिक प्रवासाचे, संगीत साधनेचे प्रमुख आश्रयस्थान झाले आहे. यंदाच्या माघी गणेश जन्मोत्सवात सोमवारी सायंकाळी सात वाजता क्षेत्रजागर, रात्री नऊ वाजता गणेशभक्त संगीत सेवा हे कार्यक्रम होणार आहेत. या मंदिराकडे परत रसिकांचे आणि कलावंतांचे पाय वळावेत म्हणून मंगळवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सुश्राव्य गायनाचे आयोजन केले आहे. हे गाणे प्रत्यक्ष मेनरोडवर सायंकाळी सात ते दहा या वेळात होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर सुभाष दसककर आणि तबल्यावर  नितीन वारे हे संगीत साथ देणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता पुण्याचे निनाद देव यांचे गायन होणार आहे. त्यांना संगीतसाथ सुभाष दसककर व पवार तबला अ‍ॅकॅडमीचे संचालक नितीन पवार हे देणार आहेत. दरवर्षीप्रमाणे मंत्रजागर व गणेशजन्माचे कीर्तन हेही महोत्सवात होणार आहे. कार्यक्रमांना नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.