आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे शांततेत सुरू आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने इतर घटकांच्या मुलभूत अधिकारांना धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरण येथे मांडली.
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये तरूणाईचा मोठा सहभाग आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लोक एकत्रित येतात आणि शांततेत मोर्चा काढतात ही मराठा समाजाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. राज्य व केंद्र सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. आरक्षण देताना समाजातील इतर घटकांच्या मुलभूत अधिकारांना धक्का न लावता योग्य निर्णय घ्यावा.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असे मत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. राज्यकर्त्यांनी केवळ ‘समाजाच्या भावनांशी सहमत आहोत’ असे म्हणून चालणार नाही. राज्यकर्त्यांनी कृती करायला हवी, असे सांगत पवार यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला होता. मी राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही अधिकार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या हाती अधिकार आहेत, त्यांनी कृती करायलाच हवी, असे शरद पवार यांनी सांगितले होते.  सध्याच्या मोर्चांमध्ये संयम आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील लोकांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले होते.