पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर होणारी बळजबरीच्या कर्जवसूलीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीक विम्याची रक्कम कर्जात वळती करून घेऊ नये. तसेच कपात केलेली विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. चलन तुटवड्यामुळे बंद झालेले विमा वाटप तात्काळ सुरु करावे, अशा अनेक मागण्यांसाठी उस्मानादमध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या विविध शाखांना टाळे ठोकले.

पीकविमा वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे उस्मानाबादमधील अनेक शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांत चलन तुटवडा असल्यामुळे विम्याची रक्कम मिळत नाही. त्यात बँकेकडून थकीत रक्कम विम्यातून कपात केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने उस्मानाबाद मधील ढोकी, येडशी, इटकुर या ठिकाणी आंदोलन करत बँकांच्या शाखेना टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काल शिवसेनेने या आंदोलनाची रणनीती आखली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबादचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या आदेशानंतर हे आंदोलन करण्यात आल्याचं इटकुर येथील शिवसैनिकानी सांगितलं.
अवकाळी पाऊस किंवा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. पीक नुकसानीनंतर ४८ तासात विम्याचा दावा करावा लागतो, अशी अट आहे मात्र, शेतकऱ्यांना याची कल्पना नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेपासून शेतकरीच नव्हे, तर कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांचे लोकही अनभिज्ञ आहेत. या प्रकाराने काही भागातील शेतकरी त्रस्त असताना उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.