अभिनेता मिलिंद शिंदे यानं खास ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी मांडलेलं ह्रद्य मनोगत…

तुमची तेरा तारीख आहे का? (हा तारीखचा उच्चार ‘पलिकडचा’)
मी विचार करून ‘हो’ म्हणतो.. कुठल्याशा उत्सवाचा संयोजक पलिकडून बोलत असतो.. ‘आपला कार्यक्रम आहे.. तुम्हाला यायचं आहे.’ (सगळं परस्पर ठरलेलं.. मी ‘हो’ किंवा ‘नाही’ याला काही अर्थ नाही.)’
अहो पण..?
नाही.. तुम्हाला यावं लागेल..
मी जातो..
मला कधी कधी कळत नाही. मी कलावंत झालो आणि कुणीही फोन करावा, म्हणावं, तुम्हाला इतकं इतकं मानधन देतो, तुम्ही या..
मी जातो. मानधन ठरलेलं असतं.. गेल्यावर अगत्य होतं.. त्यात त्यांचे आप्तस्वकीय भेटतात.. सोन्यानं मढलेले त्याचे कार्यकर्ते भेटतात..
त्यांच्या सोन्याकडं पाहून आपली लाइन चुकली असं वाटायला लागतं.. मला वडा-पाव.. भजी, जिलेबीचा आहार देतात –
आणि..
आणि..
आमच्या साहेबांबद्दल असं-असं चांगलं बोला, असं कुणी तरी कार्यकर्ता सांगतो..
मी खिन्न..
मी विकत घेतलेला..
हायर्ड…?
सदसद्विवेकबुद्धी साथ देत नाही..
असं.. का..?
इथं मी उरतो शून्य..
—————–
चला ठीक आहे कलावंत + माणूस + पैसा पाहिला की अशी विचारांची गडबड होणारच..
हलायला कधी होतं मला..
मी करू पाहतोय हो लाख..
मग तशी नाटकं.. सिनेमे येतात का?
नाही..
कारण अनुनय.. तुफान..
माझी कुणाशी तक्रार नाही पण.. विवेक बेळे आणि संजय पवार, संजय पाटील सोडले तर किती लोक अनुनय सोडून स्वत: व्यक्त झाले आहेत आणि निमित्तानं मलाही व्यक्त होऊ दिलंय..?
मला म्हणजे..
कलावंताला, एका अभिनेत्याला त्यासाठी ‘मीच’ असणं गरजेचं नाही..
भीती वाटते लेखकाला मुक्तपणे व्यक्त व्हायची. नक्कीच भीती वाटते निर्मात्याला चाकोरीच्या बाहेर जाऊन निर्मिती करण्याची..
दिग्दर्शकही तसेच.. निर्मात्याच्या दावणीला बांधलेले..
राहिला सिनेमा –
त्या सेन्सॉरनं.. मराठी सिनेमाला इतका बांधून ठेवलाय की आमच्या ग्रामीण भागातली आईसुद्धा मुलीला इतकं ताब्यात ठेवत नाही.. धाकात ठेवत नाही.. पण जाच आहेच. त्यामुळं व्यक्त होणं सोडाच मांडणंही होत नाही..
निमित्तानं होते काय..
सत्य येतच नाही हो बाहेर..
अशा बंदिस्त चौकटी.. कसं व्यक्त होणार?
कसा जाणार समाज पुरोगामित्वाकडे..?
नुसत्या बाता हो..?
बरं, एकमेकाला मदत न करण्यात आम्ही कलावंत माहीर..
अभ्यंकर गेले.. सतीश माझा मित्र गेला आणि नाटकी वागलो तो पर्टिक्युलर दिवस मग..?
शून्य..
चला सोडा, पूर्ण वेळ आम्ही कलावंत नसतो, नसूही नये.. पण माणूस म्हणून..?
असावं.. ना..?
या देशाचा नागरिक म्हणून असावंच ना.
मी ते.. तो असं म्हणत नाही. इथं मी ‘मी’ म्हणतो-
इथं मी असतो अर्धषंढ..
व्यक्तच होत नाही..
माझं काही म्हणणंच नसतं..
मी माझा ‘पर डे’ माझे घर.. झमेलाच नकोय मला कुठला..
दाभोलकर साहेब गेले..
पण स्वत:च्या गाडीला लिंबू-मिरच्या लावणारे आम्ही कलावंत..?
स्वत:च्या गाडय़ांमध्ये देवदेवतांचे फोटो लावणारे आम्ही कलावंत..?
लावावेत फोटो.. पण त्यांचा इष्ट आदर करतो का..?
हातात विविध गंडे-दोरे, बोटांमध्ये पन्नास प्रकारच्या अंगठय़ा.. हा यांचा पुरोगामीपणा. कसला बाष्कळ आणि पोकळ आहे हो.. हे म्हणे दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करणार..
उरलेला मी..
उरलेला मी फारच असहाय्य आणि दीन आहे हो –
‘पर डे’च्या पाठीमागे धावणारा?
निर्मात्याचं लांगुलचालन करणारा..
मी अव्यक्तच आहे..
आम्ही एकमेकाला जोखतो त्याच्या कपडय़ावरून, किती किमतीचा मोबाइल, शर्ट, पँट यावरून, त्याच्याकडं कुठली गाडी आहे यावरूनच.
कलावंत कुठे आहे या मध्ये..?
मी गणपती बसवतो की नाही यावरून. मी गणपती बसवला, घटस्थापना केली तर मी चांगला माणूस. अन्यथा.. मी नास्तिक.
या संकल्पना आल्या कुठून..!
कशा आल्या? आणि बळावल्या कशा..?
हा आस्तिक-नास्तिक शब्दच विभाजक आहे. या असल्या फालतू अलंकरणाशिवाय नुसता माणूस असू शकत नाही का..?
उत्सवांच्या तराजूमध्ये तोलून तुम्हा-आम्हाला नास्तिक-आस्तिक ठरवणार..? टिळकांचा गणेशोत्सव आहे का उरला..?
त्यात सोन्याचा घड गळ्यात मिरवणारे आणि भर रात्री गॉगल लावून फिरणारे समाजसेवक (?) स्थिरावतायत.
अशिक्षित राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं स्तोम इतकं माजलंय की.. काय बोलावं.. त्यांच्या निष्ठा, त्यांची शीलं, नीतिमत्ता.. कशा मोजायच्या..? आणि हे आमचे कार्यसम्राट नेते..?
सगळं जातीत अडून बसलंय. तो अमुक अमुक जातीचा, ‘आमचा’ त्यांना निवडून द्या.. याच्यात शिकलेला, ज्ञानी राहतो बाजूला आणि ‘गुंठा’मंत्री निवडून येतो..
परिस्थिती अशीच आहे..
आणि बदलायला फार वेळ आहे –
फुले-शाहू-आंबेडकर धक्का लागल्यावर एकमेकाला सॉरी जसं म्हणतो इतक्या दर्जाची झाली आहेत..
अजून असंच चालू राहिले तर.
मी मी कलावंत.. मी नागरिक म्हणून.
शून्याहूनही कमी..
असण्याची मला भीती वाटते म्हणून हा प्रपंच..
शून्य असण्याची, होण्याची भीती बाळगू या.
एकपासून पुढे सुरुवात करू या.
जयहिंद –
उद्या फक्त आपण इतक्या लायक देशाचे नालायक नागरिक होतो याची लाज नको वाटायला..
म्हणून व्यक्त होऊ पाहतोय
उद्या मलाच वाटलं पाहिजे
भारत माझा देश आहे
आणि माझ्या देशावर माझं खरंच प्रेम आहे.
– मिलिंद शिंदे