दोन हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन आणि ‘कलर’ वाहिनीवरील एका मालिकेच्या निर्मिती-दिग्दर्शनानंतर जाहिरात क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व अभिनय देव आता पहिल्यांदाच ई टीव्ही मराठी वाहिनीवरील एका कार्यक्रमाकरता ‘क्रिएटिव्ह सुपरव्हिजन’ करणार असल्याचे ई टीव्हीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मराठी दूरचित्रवाहिन्यांवर आजवर झालेल्या रिअ‍ॅलिटी शो किंवा अन्य कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम वेगळा असल्याचा दावाही या सुत्रांनी केला.  जाहिरात क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर अभिनय बॉलिवूडकडे वळला. ‘गेम’ व ‘दिल्ली बेल्ली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले. ‘कलर’ वाहिनीवरील ‘२४ ’ या मालिकेचा निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही त्याने छोटा पडदा गाजविला. नावात ‘अभिनय’ असला प्रत्यक्षात अभिनय न करता पडद्यामागे राहून  आपले कर्तृत्व सिद्ध करणारा अभिनय देव आता पहिल्यांदाच ई टीव्ही मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘झुंज मराठमोळी-आता मातीच ठरवेल कस’ या रिअ‍ॅलिटी शो चे ‘क्रिएटिव्ह सुपरव्हिजन’ करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे. या कार्यक्रमात मराठीतील १४ नामवंत सेलिब्रेटी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमधील साहसी खेळ सादर करणार आहेत. त्यासाठी राज्यातील काही प्रमुख शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये जे  साहसी खेळ गेली अनेक वर्षे खेळले जात आहेत, त्या खेळांची निवड या कार्यक्रमासाठी  करण्यात आली आहे. यात मल्लखांब, गोविंदा (दहीहंडी) दोरीवरचा मल्लखांब आणि अन्य काही साहसी खेळांचा समावेश आहे. ‘रोड ट्रॅव्हल’ या प्रकारातील ही कार्यक्रम मालिका नक्कीच वेगळी ठरेल, असा विश्वास या सुत्रांनी व्यक्त केला.
आगळा आणि भव्य कार्यक्रम
मराठी दूरचित्रवाहिन्यांवर आजवर झालेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘झुंज मराठमोळी’ हा कार्यक्रम आगळा आणि भव्य असणार आहे. मराठी वाहिनीवर अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदा होत आहे. हिंदी मालिका किंवा हिंदी रिअ‍ॅलिटी शोची जी भव्यता असते तशीच ती या कार्यक्रमात पाहायला मिळेल. प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा आणि चित्तथरारक व साहसी खेळांचा हा कार्यक्रम नक्की आवडेल.
अभिनय देव