गौरी शिंदे हे मराठमोळं नाव जेव्हा बॉलीवूडमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाची दिग्दर्शक म्हणून झळकलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पहिल्याच चित्रपटात श्रीदेवीला इतक्या सुंदर पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणत, इतका साधा, पण लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय पहिल्यांदाच पडद्यावर आणताना तो व्यावसायिकरीत्याही गौरीने यशस्वी करून दाखवला. त्यामुळे तिच्या दुसऱ्या चित्रपटाची चर्चा जेव्हा सुरू झाली आणि शाहरूख खान-अलिया भट्टसारखी नावं आली तेव्हा ती काहीतरी मोठा व्यावसायिक चित्रपट करेल, अशी अटकळ बांधली गेली. प्रत्यक्षात ‘डिअर जिंदगी’चा विषयही रोजच्या आयुष्याशी निगडित होता आणि शाहरूख-अलियासारखे मोठे चेहरे असूनही तो गौरीने तिच्या नेहमीच्याच साध्या-सुंदर शैलीत प्रेक्षकांसमोर आणला. तिच्या या चित्रपटाला विशेष दादही मिळाली. ज्याचा उल्लेख ती माझ्या कामाचं चीज झालं अशा शब्दांत करते. मी इथे काहीतरी वेगळ्या, विलक्षण गोष्टी सांगायला आले आहे. त्यामुळे करोडो रुपये कमावणारे चित्रपट करण्यात मला रस नाही, असं गौरीने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना स्पष्ट केलं.

‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर ‘झी सिनेमा’ वाहिनीवर होतो आहे. रविवारी, २३ एप्रिलला हा चित्रपट दुपारी १२ वाजता दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना गौरीने सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जो नायिकाप्रधानपटांचा प्रवाहो आला आहे, त्याबद्दलही आपलं मत मांडलं. आपल्याकडे नेहमी एखादी वेगळी कल्पना क्लिक् व्हावी लागते. ती कल्पना लोकांना आवडली की मग त्याचा ट्रेंड होतो. म्हणजे दरम्यानच्या काळात बालचित्रपटांचा एक ओघ आला होता. लोकांना ते आवडत होते, राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे एकापाठोपाठ एक बालचित्रपट आले. तशीच काहीशी गोष्ट ही नायिकाप्रधान चित्रपटांच्या बाबतीत म्हणता येईल. हा प्रवाह ‘कहानी’पासून सुरू झाला. त्याच वेळी ‘इंग्लिश विंग्लिश’ही आला होता. या दोन चित्रपटांना प्रेक्षकपसंती मिळाली. आणि त्यांनी पैसाही कमावला. त्यामुळे असा एक तरी चित्रपट हिट व्हावाच लागतो. तेव्हा कुठे मग इतरजण त्यापासून प्रेरणा घेतात. आणि मग आपल्याला त्यातही वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहायला मिळतात. त्या गोष्टी वेगाने वाढत जातात, असं तिने सांगितलं.

शाहरूख खान आणि अलिया भट्ट हे दोन्ही चेहरे खरं म्हणजे तद्दन व्यावसायिक चित्रपटांसाठीच ओळखले जातात. त्यांच्याकडून ‘डिअर जिंदगी’सारखा चित्रपट करून घेणं हा अनुभव दिग्दर्शक म्हणून कसा होता, या प्रश्नावर तिने खरं म्हणजे त्या दोघांनाही या चित्रपटाचा अभिमान वाटतो, असं सांगितलं. ‘डिअर जिंदगी’मध्ये काम करण्यासाठी ते दोघेही सहज तयार झाले. आणि चित्रपटाचं म्हणाल तर हा पूर्णपणे टीमने मिळून केलेला चित्रपट आहे. आम्ही तिघंही सतत चर्चा करत होतो, कुठे कशा पद्धतीने काय करता येईल, कसं करायला हवं.. एकमेकांच्या चर्चेतून, विचारांच्या देवाणघेवाणीतून हा चित्रपट आकाराला आला आहे, असं तिने सांगितलं. पहिल्याच चित्रपटात श्रीदेवीबरोबर काम करण्याचा अनुभव तिच्या गाठीशी होता. पण शाहरूख खान काय किंवा अलिया भट्ट काय. हे दोघेही बुद्धिमान कलाकार आहेत. आणि अशा कलाकारांबरोबर काम करताना ते कसं होईल, याची चिंताच नसते. त्यामुळे ‘डिअर जिंदगी’ हा खूपच सुखद अनुभव होता, असं ती म्हणते. ‘डिअर जिंदगी’चे चित्रीकरण झाल्यानंतरही कित्येक दिवस शाहरूख खान किंवा अलिया भट्ट यांच्या इन्स्टा किंवा अन्य समाजमाध्यमांवरून या दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने आपण अजूनही ‘डिअर जिंदगी’च्या प्रभावाखाली असल्याची कबुली दिली होती. त्याबद्दल बोलताना हा चित्रपट त्या दोघांनी खरोखरच स्वत:चा चित्रपट म्हणून केला, असं तिने सांगितलं.

एखाद्या चित्रपटाचं, विषयाचं असं भाग्य असतं की तो या ना त्या प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. ‘डिअर जिंदगी’मध्ये डॉ. जहांगीर असेल किंवा अलियाची व्यक्तिरेखा असेल.. त्या कुठेतरी तुमच्या व्यक्तिगत आयुष्याशी तुम्ही जोडून घेऊ शकता, अशा व्यक्तिरेखा आहेत. आणि या दोन्ही कलाकारांनी त्याच सहजतेने त्या भूमिकेत शिरून काम केलं. एवढंच नाही. तर खरं म्हणजे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मी त्याची प्रसिद्धीही केली नाही. शाहरूख आणि अलिया दोघांनीच ठिकठिकाणी जाऊन या चित्रपटाची प्रसिद्धी केली. ही दोन नावं खरं म्हणजे चित्रपट पुढे नेण्यासाठी पुरेशी असल्याने मी त्यात लक्षही दिलं नाही. पण मुळात त्या दोघांनी आपणहून चित्रपटाची प्रसिद्धी केली, हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं, असं सांगतानाच ‘डिअर जिंदगी’मुळे आपलं आयुष्य बदलल्याची पोच अनेक सर्वसामान्य प्रेक्षकोंनीही दिली असल्याचं तिने सांगितलं. तुमचा चित्रपट पाहून आम्हाला खरोखरच जगावंसं वाटतं आहे, आयुष्याला पुन्हा एकदा मिठी मारावीशी वाटतेय, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. मला वाटतं ते या चित्रपटाचं खरं यश आहे, असं ती स्पष्ट करते. गौरी स्वत: मराठी आहे. मराठी चित्रपटही ती आवर्जून पाहते. त्यामुळे पुढेमागे ती मराठी चित्रपट दिग्दर्शन करण्याची शक्यता आहे का?, या प्रश्नावर तिने मराठीत इतके सुंदर चित्रपट बनतात.. की त्याचा दर्जा हिंदी चित्रपटांपेक्षाही वरचा आहे, असं सांगत अजून तरी इतके चांगले चित्रपट बनवणं हे एक आव्हानच असल्याचं मत व्यक्त केलं.

माझ्यासाठी  चित्रपट हा व्यवसाय नाही. ती कला आहे. अर्थात आपल्या कलाकृतीने, चित्रपटाने पैसेही मिळवले पाहिजेत, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे धडाधड एकापाठोपाठ एक चित्रपट करणं हा माझा पिंड नाही. माझे चित्रपट हे मानवी भावभावनांशी, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहे. त्यात हावभाव आहेत, शब्द आणि अभिनयापलीकडे अव्यक्त भावनांचं व्यक्त होणं आहे. त्यामुळे जो चित्रपट उत्तम विषय, मांडणीचा आहे आणि तो चांगला व्यवसायही करतो तो व्यावसायिक चित्रपट असं मला वाटतं.  ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘डिअर जिंदगी’सारखे विषय मला जवळचे वाटतात. आणि म्हणून मला जो विषय पटेल, रुचेल तेच चित्रपट मी यापुढेही करत राहीन. – गौरी शिंदे