तीन दिवसांत १२ कोटी १० लाखांची कमाई

‘फॅण्ड्री’नंतर रुपेरी पडद्यावर दाखल झालेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ‘झी स्टुडिओ’च्या ‘सैराट’ने लोकप्रियतेबरोबरच बॉक्स ऑफिसवरही ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे केली आहेत. शुक्रवार ते रविवार या पहिल्या तीन दिवसांत ‘सैराट’ने १२ कोटी १० लाखांचा गल्ला जमविला असून मराठीत तो एक नवा विक्रम आहे.

प्रदर्शनापूर्वीच ‘सैराट’ची हवा आणि प्रसिद्धी झाली. त्याचा फायदा तिकीटबारीवरही झालेला पाहायला मिळाला. तीन दिवसांतही रविवारचा गल्ला सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन-चार वर्षांत मराठीत जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक गल्ला जमविणारा ‘सैराट’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ने पहिल्या तीन दिवसांत १० कोटी ५० लाखांचा गल्ला जमविला होता, तर त्याअगोदर ‘टाइमपास- २’ चित्रपटानेही पहिल्या तीन दिवसांत १० कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळविले होते. ‘लई भारी’ने १० कोटी तीन दिवसांत जमविले होते.

महाराष्ट्रात सुमारे ४२० चित्रपटगृहांत ‘सैराट’ प्रदर्शित झाला असून सुरुवातीला एकाच वेळी चित्रपटाचे ८ हजार ५०० खेळ सुरू होते. प्रेक्षकांच्या मागणीवरून आता ही संख्या साडेनऊ हजारांच्या पुढे गेली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.