बॉलिवूडची नावाजलेली नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिचा नवरा शिरीष कुंदर हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. शिरीषने योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात असे काही वक्तव्य केले होते की, ज्यामुळे शिरीषविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे अखेर शिरीषने त्याचे शब्द मागे घेत ट्विटरवरुन माफी मागितली.

शिरीषने योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात दोन ट्विट केले होते. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडे शिरीष विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे ट्विटवरून आपले ट्विट काढून टाकण्याशिवाय शिरीषकडे काहीच पर्याय उरला नाही. या प्रकरणात अयोध्याचे ठाकुरद्वार ट्रस्टचे सचिव अमित कुमार तिवारी यांनी लखनऊमध्ये शिरीषविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर शिरीषने लगेच आपले ट्विट काढून टाकले आणि एक नवे ट्विट केले. यात ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी बिनशर्त सर्वांची माफी मागतो.’

त्याचे झाले असे की, शिरीषने ट्विटच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांची तुलना गुंड आणि बलात्कारी यांच्यासोबत केली होती. शिरीषने ट्विटमध्ये म्हटलेले की, ‘एखाद्या गुंडाकडे सरकार देऊन त्याच्याकडून दंगे न होण्याची अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या बलात्काऱ्याला बलात्कार करण्याची संमती देऊन तो तसे करणार नाही अशी अपेक्षा करण्यासारखे आहे.’ नंतरच्या ट्विटमध्ये शिरीषने लिहिले की, ‘एखाद्या गुंडाला मुख्यमंत्री बनवणे योग्य असेल तर दाऊदला सीबीआयचा डायरेक्टर आणि विजय मल्याला आरबीआयचा गव्हर्नर बनवले जाऊ शकते.’

आपल्या ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शिरीषची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही शाहरुखच्या ‘रा वन’ या सिनेमाला घेऊन शिरीषने ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटवरुन शाहरुख चांगलाच रागावला होता. एवढेच नाही तर एका पार्टीत शाहरुखने शिरीषला कानशिलातही लगावली होती.