नवीन महाराष्ट्र सदन उद्घाटनाच्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन झाले होते. या कार्यक्रमात चक्कवीज गेली होती व निवासी आयुक्त विपीन मलिक यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा ‘उजेड’ पडला होता. सदनात मिळणारे निकृष्ट चवीचे जेवण व मलिक यांच्या मराठी द्वेषामुळे ही वास्तू कधीही दिल्लीस्थित मराठी माणसाला आपली वाटली नाही. त्यात आता शिवसेना खासदारांच्या धुमाकुळास ‘धार्मिक’ रंग चढल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा कमी झाली आहे. मलिक व सेना खासदारांच्या परस्पर संघर्षांत महाराष्ट्र सदन बदनाम झाल्याची भावना दिल्लीतील मराठी वर्तुळात व्यक्त होत आहे.
या वादास शिवसेना खासदारांची दबंगगिरी व मलिक यांचा मराठीद्वेष सारखाच कारणीभूत आहे. गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत एकाही मराठी कार्यक्रमाला मलिक उपस्थित नव्हते. दि. २२ जुलै रोजी झालेल्या सहय़ाद्री महोत्सवास मलिक यांनी ऐन वेळी परवानगी नाकारली. त्यासाठी देण्यात आलेल्या कारणामागे निव्वळ मराठीद्वेष होता. ध्वनिप्रक्षेपण यंत्रणा वापरायची नाही, खुच्र्याची रचना बदलायची नाही, कार्यक्रम एकीकडे तर भोजन भलतीकडे, मराठी सिनेमा दाखवायचा असेल तर उपलब्ध साधनांमध्ये व्यवस्था करायची, अशा जाचक अटी त्यांनी ठेवल्या होत्या. आयोजकांनी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्वाना स्थान बदलल्याचा ई-मेल धाडला होता. त्यात सदनाच्या प्रशासनाकडून आलेल्या अनुभवांची जंत्रीच होती. मलिक केवळ सामान्य मराठी नागरिकांशीच नव्हे तर राज्यातील मंत्र्यांशीदेखील असेच अरेरावीने वागत असल्याची तक्रार आहे. रोजगार हमी योजनामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रस्तावित पत्रकार परिषदेस मलिक यांनी ऐन वेळी सभागृह देण्यास नकार दिला. दि. ३० मे रोजी राऊत यांनी दिल्लीत खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्याची माहिती देण्यासाठी राऊत यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे पत्रकारांना अधिकृत एसएमएस पाठवला होता. ऐन वेळी अन्य सभागृहात राऊत यांना ही पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. महाराष्ट्र सदनात कॅण्टीन चालविण्यासारखी परिस्थिती नाही. सदनाचे उपव्यवस्थापक नितीन गायकवाड यांनी शिवसेना खासदारांना दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कॅण्टीनच्या निविदांवर सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. हैदराबादचा एक केटरर वगळता अन्य कुणीही निविदा भरीत नाही. निविदेसाठीचे नियम मलिक यांनीच निश्चित केले आहेत.