‘आवाजी’ फटाक्यांच्या विक्रीवर, तसेच विशिष्ट वेळेनंतर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही मुंबईत अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांचा कर्णकर्कश धूमधडाका सुरूच होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुतळी बॉम्बसारख्या कर्णकर्कश फटाक्यांचे अस्तित्व यंदा फारसे जाणवत नव्हते. परंतु, रॉकेट बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बसारख्या आवाजी फटाक्यांमुळे यंदाही दिवाळीत ध्वनीची मर्यादा पाळली गेली नसल्याची तक्रार आहे. विशेषत: रात्री १०नंतर फटाके वाजविण्यास बंदी असूनही अनेक ठिकाणी हे बंधन पाळले गेले नाही.
‘आवाज फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबईत अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची नोंद घेत या संबंधात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे (एमपीसीबी) सदस्य सचिव राजीव कुमार मितल यांच्याकडे लेखी तक्रारच दाखल केली आहे. या तक्रारीत कार्टर रोड, मरिन ड्राइव्ह, वरळी, पाली हिल, पेडर रोड, सांताक्रूझ आदी मुंबईच्या काही भागात फटाक्यांमुळे आवाजाच्या पातळीचे कसे उल्लंघन झाले याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, वारंवार तक्रार करून पोलीसही या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याकडे ‘आवाज फाऊंडेशन’च्या संचालिका सुमेरा अब्दुल्ला यांनी आपल्या तक्रारीत लक्ष वेधले आहे.
दिवाळीपूर्वीही फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि हवेच्या प्रदूषणाबाबत ‘आवाज फाऊंडेशन’ने पोलीस आणि एमपीसीबी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर उत्तर देताना मुंबईत ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ‘आवाजी’ फटाक्यांवरच बंदी असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्ष दिवाळीत अशा फटाक्यांमुळे ध्वनीच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मरिन ड्राइव्ह परिसरात रात्री १०.२० नंतरही फटाके वाजविण्यात येत होते. पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार केल्यानंतरही या परिसरात रात्री सव्वाबारापर्यंत फटाक्यांचा धूमधडाका सुरूच होता, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
आधी नियमात स्पष्टता आणा
ध्वनिप्रदूषणाबाबत रात्री १० पर्यंतची वेळेची मर्यादा घालणारा नियम ध्वनिक्षेपकाला लागू आहे. फटाक्यांबाबत या नियमात स्पष्टता नाही. त्यामुळे, आधी या नियमात स्पष्टता आणावी. तसेच, अशी बंदी फटाक्यांबाबतही असल्यास त्याचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी सुमेरा अब्दुल्ला यांनी केली आहे.