शिवसेनेच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरलेल्या आणि असंख्य घटनांचे साक्षीदार असलेल्या शिवसेना भवनाच्या नव्या वास्तूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन दुर्लभच झाले. तीन वर्षांपूर्वी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख शिवसेना भवनात गेले होते. त्यांची ती अखेरचीच भेट ठरली.
शिवसेनेच्या चढ-उताराची साक्षीदार असलेल्या शिवसेना भवनाचे नूतनीकरण २००६ मध्ये करण्यात आले. दिमाखात उभ्या राहिलेल्या या वास्तूचे उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु त्यानंतर या नव्या वास्तूत बाळासाहेबांचे पाय क्वचितच लागले. बाळासाहेबांचे शेवटचे दर्शन या वास्तूला झाले ते तीन वर्षांपूर्वी. विधानसभेच्या मागील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ५ नोव्हेंबर २००९ रोजी शिवसेनेच्या नवनिर्वाचित ४४ आमदारांची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. बाळासाहेब या बैठकीला उपस्थित होते. हीच बाळासाहेबांनी शिवसेना भवनाला दिलेली अखेरची भेट ठरली. त्यानंतर वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे बाळासाहेबांचे ‘मातोश्री’बाहेर फिरणेच बंद झाले. शिवसेना सोडून जाणाऱ्यांचा खरपूस समाचार घेताना ‘शिवसेना अस्वलासारखी असून या अस्वलाचा एक केस उपटला तरी काही फरक पडणार नाही,’ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
या वास्तूशी निगडित बाळासाहेबांच्या आठवणी जागविताना शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी जणू इतिहासाची पानेच उलटली. आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या लाटेत ‘शिवसेना’ नावाची मराठी अस्मिताही वाहून जाते की काय, अशी परिस्थिती होती. पक्षातील काही नेत्यांनी शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या वेळी शिवसेना भवनाच्या गच्चीवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘शिवसेने’चे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. ‘बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आज सर्वाधिक जुना पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख टिकून आहे. अनेक पक्ष फुटल्याने किंवा विलीनीकरणामुळे आपले जुने नाव गमावून बसले आहेत. त्या अर्थाने इंदिरा काँग्रेसही शिवसेनेनंतर जन्मलेला पक्ष आहे,’ अशी प्रतिक्रिया रावते यांनी व्यक्त केली.
पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर पत्रकारांच्या निषेध आंदोलनादरम्यान उद्भवलेली तणावाची परिस्थितीही या वास्तूने अनुभवली. वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर अनेक ज्येष्ठ पत्रकार सेना भवनासमोर निषेधाच्या घोषणा देत जमले होते. त्या वेळी बाळासाहेब ‘मातोश्री’वरून येथे आले आणि आपल्या कार्यालयात बसून राहिले, पण त्यांनी शेवटपर्यंत या हल्ल्याबाबत माफी मागितली नाही.
हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर आक्षेप घेतल्यामुळे असाच एक नाजूक प्रसंग उद्भवला होता. या वादामुळे बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला, पण सभेसाठी सेना भवनासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर बाळासाहेबांव्यतिरिक्त शिवसेनेच्या एकाही नेत्याला येऊ देण्यास शिवसैनिक तयार नव्हते. सरतेशेवटी बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर सभेला सुरुवात झाली. याच क्षणी बाळासाहेबांचे पक्षातील अनभिषिक्तपण सिद्ध झाले आणि ते त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिले.