विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्याच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह

दरवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात दाखल होणाऱ्या सचिवालयाच्या कामकाजाची व्याप्ती ही सभागृहातील कामकाजासाठी लागणारे निवेदन तयार करणे आणि या दरम्यान उपस्थित प्रश्नांसाठी मंत्र्यांना मदत करणे या पुरतीच मर्यादित असल्याने अधिवेशन येथे घेण्याच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी विदर्भात स्वतंत्र राज्याची मागणी ऐरणीवर होती. मात्र, ती बाजूला ठेवून विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाला होता. या भागातील जनतेच्या मनातील वेगळेपणाची भावना दूर करता यावी आणि या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवता याव्या म्हणून दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे ठरले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे अधिवेशन तीन महिन्याचे व्हावे आणि या निमित्ताने संपूर्ण सरकारच विदर्भात म्हणजे नागपुरात राहावे,

असे त्यांच्या भाषणात स्पष्टही केले होते. या पाश्र्वभूमीवर नागपुरात होणाऱ्या अधिवेशनाचा कार्यकाळ, तेथे होणारे कामकाज, विदर्भासाठी मिळणारा वेळ आणि यासाठी येथे उपस्थित राहणारी प्रशासकीय यंत्रणा या सर्वच पातळीवर केवळ औपचारिकता उरली असल्याचे स्पष्ट होते.

सचिवालयाचा विचार केला तर दहा दिवस आधी कर्मचारी येथे येतात. सचिव पातळीवरील अधिकारी दोन दिवस आधी आणि काही प्रधान सचिव तर केवळ त्यांच्या खात्याचे प्रश्न असेल तरच नागपुरात हजेरी लावतात. प्रश्न संपला की ते मुंबईला रवाना होतात. ग्रंथालयाचा अपवाद सोडला तर इतर विभागाचे कामही अधिवेशनापासूनच सुरू होते.

सभागृहातील कामकाजासाठी लागणारे निवेदन आणि तत्सम कामासाठी लागणारी यंत्रणाच नागपुरात मुक्कामी राहते. पूर्वनियोजित घोषणांचा अपवाद सोडला तर महत्त्वाच्या निर्णयासाठी मुंबईतच बैठक बोलवण्याचे आश्वासन मंत्र्यांकडूनच सभागृहात दिले जाते. या सर्व पाश्र्वभूमीवर सोमवारपासून शहरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दोन आठवडय़ाच्या कार्यकाळात विदर्भाचे किती प्रश्न मार्गी लागणार, मंत्री किती लोकांना भेटणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मंत्री आत, लोक बाहेर!

विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन असले तरी सरकार आणि या भागातील नागरिक यांची भेटच होऊ शकत नाही. मंत्री आत आणि लोक बाहेर असे चित्र अधिवेशनादरम्यान असते. मंत्री मोजक्याच लोकांना त्यांच्या बंगल्यावर भेटतात. शनिवार, रविवार या कामकाज नसणाऱ्या दिवशी मंत्र्यांचे दौरे असतात. प्रश्न सुटावे किंवा त्याकडे किमान लक्ष वेधले जावे म्हणून विदर्भातूनच नव्हे तर राज्याच्या  काना कोपऱ्यातून लोक नागपुरात येतात. मात्र, मोजक्यांची भेट मंत्र्यांसोबत होते.