मुसळधार पाऊस आणि नदीघाटांवरील चिकचिकाट यांची पर्वा न करता कचरावेचक आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे विसर्जनाबरोबर येणारे निर्माल्य गोळा केले.   ‘स्वच्छ’ संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल ९७ टन निर्माल्य आणि कोरडा कचरा गोळा झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी सात टन अधिक निर्माल्य गोळा झाले आहे.
गणेशमूर्तीच्या विसर्जनाबरोबरच निर्माल्याची फुले आणि कागद, प्लास्टिक, थर्माकोलपासून केलेली सजावटही नदीत विसर्जित केली जाते. हे टाळण्यासाठी संस्थेतर्फे शहरातील तेरा, तर पिंपरी- चिंचवडमधील दोन घाटांवर निर्माल्य गोळा करण्यात आले. २०१० साली केवळ ३१ टन निर्माल्य गोळा करण्यात संस्थेला यश मिळाले होते. या उपक्रमाला असलेला प्रतिसाद वाढून गेल्या वर्षी ९० टन निर्माल्य गोळा झाले होते. या वर्षी एकूण १२५ कचरावेचक आणि चारशे स्वयंसेवकांनी या कामात सहभागी झाले होते. गोळा केलेल्या निर्माल्यातील कोरडा कचरा पुनर्निर्मितीच्या साखळीत सोडण्यात येणार आहे, तर जैविक घटकांपासून खत तयार करण्यात येणार आहे.
या वर्षी कॉर्पोरेट कंपन्या आणि शिक्षणसंस्थांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कमिन्स आणि एमक्युअर या कंपन्या, रोटरी क्लब (कोथरूड व बाणेर), फग्र्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, हुजुरपागा शाळा, मास्टरमाईंड शाळा, सिंबायोसिस स्कूल ऑफ इकोनॉमिक्स या संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला.
शहरात विविध संघटनांतर्फे या प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या लायन्स सव्र्हिस फोरमतर्फे १६ घाटांवर नागरिकांना निर्माल्य दान करण्याबद्दल आवाहन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर, हडपसरमधील उन्नती घाट येथे क्लीन गार्बेज मॅनेजमेंट, सागर मित्र व साधना विद्यालय या संस्थांतर्फे शंभर किलो निर्माल्य व पंचवीस पिशव्या फळे गोळा करण्यात आली. पुणे महापालिका आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड अॅग्रिकल्चर यांच्या ‘जनवाणी’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे घोरपडी गावातील आगवली चाळीत स्वच्छताविषयक जनजागृती फेरी काढण्यात आली, तसेच ‘पपेट शो’द्वारे कचरा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.