पिंपरी महापालिकेतील महत्त्वाच्या कामांचा समावेश असलेल्या प्रस्तावांसह २००हून अधिक फाईली पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. सत्ताधारी नेत्यांमधील ‘अर्थकारण’ व नव्या आयुक्तांचा ‘अभ्यास’ सुरू असल्याने ही वेळ आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गासाठींची घरे, निगडीतील रेल्वे उड्डाणपूल, चिंचवड केएसबी चौकातील नियोजित उड्डाणपूल, पाण्याच्या टाक्या, ड्रेनेजची कामे, भोसरी हॉस्पिटल, ‘स्काडा’, बसस्टॉप, हॉटमिक्स, संगणक विभागातील कामे आदी कामांची मोठी यादी आहे. अशा जवळपास २०० फाईली अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्याविषयी गेल्या काही दिवसांपासून निर्णय होत नाही. कारण, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुंबळ ‘अर्थयुध्द’ पेटले आहे. या कामांमधून अधिकाधिक मलिदा लाटून घेण्याची स्पर्धा त्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास मर्जीतले राजीव जाधव महापालिका आयुक्त म्हणून आले. अद्याप, त्यांच्या बैठका आणि अभ्यासच सुरू आहे. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेताना ते दिसत नाहीत. त्यामुळे कामाचा वेग मंदावल्याची भावना निर्माण झाली आहे. नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या डॉ. श्रीकर परदेशी यांनी बसवलेली प्रशासकीय घडी विस्कटून टाकण्याच्या जोरदार हालचाली आहेत. मोकळे रान मिळाल्याचा आनंद सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. काही विषय रोखून धरणे, महत्त्वाच्या फाईली दाबून धरणे असे उद्योग सुरू झाले आहेत, त्यामागे निव्वळ अर्थकारण असल्याचे मानले जाते.