गेल्या दोन लेखांत आपण नाटक या कलाप्रकाराची आणि त्याच्या प्रक्रियेची तोंडओळख करून घेतली. नाटक घडण्यामागच्या प्रेरणा आणि नाटकाची माध्यम म्हणून असलेली बलस्थानं समजून घ्यायचा प्रयत्न केला. प्रेक्षक आणि नाटक यांच्यातला परस्पर संबंध पाहिला. लहान मुलं आणि नाटक यांना जोडणारा दुवा कोणता हे शोधण्याचा प्रयत्न केला. नाटकाचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी किती आणि कसा घट्ट संबंध आहे हे तपासून पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या संदर्भात लहान मुलांसाठी नाटक कसं महत्त्वाचं ठरू शकेल याचं सूतोवाच केलं.

आता त्यानंतर, आपण हे लक्षात घेऊ या की, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी नाटक किंवा नाटकाची प्रक्रिया कशी महत्त्वाची ठरू शकते. आणि त्या वयोगटातील मुलांसाठी नाटक सादर करताना कुठल्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. सगळ्यात आधी, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या वयोगटाचा विचार केला पाहिजे. कारण या आधी आपण पाहिलं की नवं काही आतमध्ये शोषून घेण्याकरता, नवं शिकण्याकरता, घडण्याकरता हे सगळ्यात योग्य वय असतं.

या वयोगटातल्या मुलांना अक्षरओळख झालेली असते. नवे शब्द आणि त्याचे अर्थ त्यांना हळूहळू उमजत असतात. त्यामुळे अक्षरांची आणि शब्दांची गंमत जितकी त्यांना येते तितकी ते आपल्याला सवयीचे असूनही येत नाही. ही मुलं नवे शब्द वापरण्याकरता उत्सुक असतात. तो वारंवार वापरून त्याचा अर्थ आणि उपयोग ते तपासूनही पाहात असतात. आता हे होत असताना त्यांना मदत होते ती दृश्य प्रतिमेची किंवा पूर्वानुभवाची. उदाहरणार्थ : ‘जहाज’ असं म्हटल्यावर किंवा वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर त्या गोष्टीची आकृती, तिचं रंग, रूप, आकार हे सगळं उभं राहतं. म्हणून मला ‘जहाज’ या शब्दाचा अर्थ कळतो. पण, मी जहाज प्रत्यक्षात किंवा चित्ररूपात कधी पाह्यलंच नसेल तर? कल्पना करून पाहा. माझ्यासाठी ती फक्त तीन अक्षरं असतात. जहाजाचा पूर्वानुभव मी घेतलेलाच नसतो. लहान मुलांकरता शब्द आणि प्रतिमा दोन्ही एकाच वेळी किंवा एका पाठोपाठ आल्या तर तो शब्द त्याच्या अर्थासकट त्यांच्या मनावर कोरला जातो. आणि म्हणूनच लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकांत चित्रं खूप असतात. (उदाहरणार्थ : माधुरी पुरंदरेंच्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकातील चित्रं/रेखाटनं.) गोष्टीतल्या व्यक्तिरेखांचे हावभावही त्या चित्रांत ठसठशीत असतात. मजकुरामध्येही शब्द मोठय़ा ठळक अक्षरात छापलेले असतात. मजकूर फार क्लिष्ट आणि मोठा नसतो. काही पुस्तकांमध्ये तर मजकूर कमी आणि चित्रांच्या माध्यमातून गोष्ट पुढे जाते. (उदा : कॉमिक्स )

आता, गोष्टीतल्या या व्यक्तिरेखा हाडामांसाच्या होऊन प्रत्यक्ष हलू-बोलू-चालू लागल्या तर? नाटकात ते शक्य होतं आणि लहान मुलांसाठी ती अवाक करणारी गंमत असते. या वयातल्या मुलांना अनुकरण करायला आवडतं. कधी कधी ती नुसती नक्कल असते. पण कधी कधी समोरच्याची कृती, बोलणं, वागणं दृष्टिकोनसुद्धा आत्मसात करून तसं ते स्वत: स्वत:च्या पद्धतीनं करू शकण्याची क्षमता त्यांच्यात तयार व्हायला सुरुवात झालेली असते. नाटकामुळे (नाटक केल्यामुळे किंवा पाहिल्यामुळे) या अंगभूत क्षमतेला प्रोत्साहन मिळू शकतं.

आणखी एक, या वयातल्या मुलांना प्रत्येक नव्या गोष्टीचं कुतूहल असतं. अचानक घडणारी कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही काल्पनिक गोष्ट त्यांना उत्तेजित करते. ‘जादू’ या गोष्टीबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता असते. नवं पाहिलेलं, अनुभवलेलं आपणही लगेच करून पाहावं असं वाटत असतं; किंबहुना प्रत्येक गोष्ट स्वत: करून पाहण्यासाठी ते उतावीळ असतात. (उदाहरणार्थ : सर्कशीला, प्राणि संग्रहालयाला,  भेट दिल्यानंतर त्यांना तिथे पाहिलेल्या प्राण्यांसारखं वागून पाहायचं असतं.) हे असं सगळं त्यांना त्यांच्या पद्धतीनं करू देणं, व्यक्त होऊ  देणं यावर बंधनं आली, अडथळे आले किंवा निर्माण केले गेले की त्यांचा विकास आणि घडण्याची प्रक्रिया खुंटते. किंवा बदलते. काही वेळा तर दुर्दैवानं थांबतेसुद्धा.

अशा प्रकारचा, वाटतंय ते करून बघण्यासाठीचा मोकळा अवकाश त्यांना नाटकाच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो आणि तो मिळायला हवा. अनेकदा, घरी, शाळेत, सार्वजनिक जागी असलेली मोठी माणसं त्यांना रोखतात, टोकतात किंवा नकळत काही गोष्टींवर बंधनं आणतात. असं वारंवार होत राहिलं तर व्यक्त होणंच थांबतं. नाटक करताना व्यक्त होण्याची सवय आपोआपच अंगवळणी पडते.

वाडा नावाच्या तालुक्याच्या गावात लहान मुलांसाठी कार्यशाळा घेत असताना आलेला एक अनुभव. मुलं प्राणी असलेलं एक नाटक करत होती. त्यातल्या एका मुलाला वाघाचीच भूमिका करायची होती. मग आम्ही त्याला वाघाची हालचाल, आवाज आणि स्वभाव याबद्दल शोध घ्यायला सांगितलं. काही दिवसांनी त्याचे पालक त्याची तक्रार घेऊन आमच्याकडे आले. ‘‘हा घरी वाघासारखा फिरतो, बोलतानाही वाघासारखे आवाज काढतो. त्याला कितीही ओरडलं तरी ऐकत नाही.’’ तुम्हाला प्राणी नसलेलं नाटक करता येणार नाही का असा त्यांचा आम्हाला प्रश्न होता. मी त्यांना समजावलं. पण तरीही त्यांना ते सगळं वेडय़ासारखं आणि चुकीचं वाटत होतं. तो मुलगा मात्र प्रचंड आनंदात होता. त्यानं ती भूमिका अगदी मनापासून केली. देहबोली, आवाज, बारकाव्यांसकट. पुढे तो मोठा झाल्यावरही भेटला. त्याच्या पालकांना वाटलेली भीती अनाठायी होती हे त्यांना पटलं होतं. नाटक संपल्यावर तो घरात तसाच वागत राहिला नाही.

या वयातल्या मुलांना कधी कधी शिकवून, मुद्दाम प्रयत्न करून एखाद्या गोष्टीत रस निर्माण होईलच असं नाही. अशा वेळी कुठल्या तरी वेगळ्या माध्यमातून आणि वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत ती पोहोचवावी लागते. उदाहरणार्थ : एखादं मूल रंग ओळखणे आणि वापरणे याबद्दल अगदी उदासीन असू शकतं. त्याला रंगांची पुस्तकं आणून देऊन, चित्रं दाखवून, रंग वापरायला देऊन, शिकवूनही त्याबद्दल रस निर्माण होत नाही. पण वेगळ्याच कुठल्या तरी माध्यमातून रंग, त्याचं नाव आणि त्याच्याशी असलेलं इतरांचं नातं याचा संबंध त्या मुलापुढे येतो आणि तो मात्र त्याच्या मनावर कोरला जातो.

नाटक हे त्या अर्थानंही एक प्रभावी माध्यम आहे. एक तर ते खूप वेगवेगळ्या घटकांनी आणि तत्त्वांनी मिळून बनतं. कुठलीही कला नाटकामध्ये सामावून घेतली जाऊ  शकते. आणि तरीही ती वेगवेगळी, सुटी राहात नाही तर नाटकाचा अविभाज्य घटक होऊन जाते. (नेपथ्य, वेशभूषा इत्यादींची योजना करत असताना रंग, रेषा, अवकाश, मिती यांचा विचार होतोच.) तिथे जे जे सामील होतं ते ‘गोष्ट’ नावाच्या खिळवून ठेवणाऱ्या एका सूत्रात बांधलं गेलेलं असतं. त्यामुळे ते एकजिनसी होऊन राहतं. गोष्टीत व्यक्तिरेखा असतात आणि या व्यक्तिरेखांच्या संदर्भात सगळे घटक काम करतात. शब्दांतून वर्णन असतं आणि मंच वस्तू, नेपथ्य, वेशभूषा यातून दृश्य प्रतिमा. उदाहरणार्थ : निळ्या आकाशात आनंदानं भराऱ्या घेणारा पक्षी नाटकात असेल तर निळ्या रंगाच्या पडद्याचा किंवा आकाशी निळ्या रंगात रंगवलेल्या कागदांचा उपयोग पाश्र्वभूमीला केलेला असू शकतो किंवा निळी ओढणी वापरून आकाशाचा भास तयार केलेला असू शकतो. आता, शब्दांतून आणि त्याचवेळी दृश्यातूनही निळा रंग आणि त्याचं आकाशाशी असलेलं नातं पक्ष्याच्या संदर्भात नाटकात वारंवार येत राहतं आणि मुलांच्या मनात यापैकी काही ना काही रेंगाळतंच.

आणखी एका कार्यशाळेची आठवण. या लहान मुलांच्या कार्यशाळेत माधुरी पुरंदरे यांच्या ‘बाबाच्या मिशा’ या गोष्टीवर काही प्रसंगनाटय़ मुलं करून पाहात होती. त्यात मुख्यत: त्यांनी पाहिलेल्या वेगवेगळ्या मिशा त्यांनीच काढायच्या, रंगवायच्या आणि त्या कापून स्वत:च्या ओठांवर चिकटवून पाहायच्या हा गमतीचा भाग होता. मुलांनी वेगवगेळ्या मिशा तयार केल्या आणि त्या लावून घेण्याकरता तर उत्साह उतू चालला होता. अर्थातच मुलीही त्यात पुढे होत्या; किंबहुना त्या जास्त उत्साही होत्या. मिशा लावून फिरताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.

पालघर जिल्ह्य़ातल्या आश्रमशाळांमध्ये लहान मुलांसाठी गोष्टींची नाटुकली सादर करतानाचा एक कमाल अनुभव. या शाळांमध्ये मुलांना जेव्हा नाटक पाहायला रांगेत आणून बसवलं जायचं, तेव्हा त्यांच्या शिक्षकांच्या सूचनेचं तंतोतंत पालन करत ती सगळी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी येऊन बसायची. बसण्याची सगळी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत त्यांनी जो काय थोडासा चिवचिवाट केला असेल तोच. मग मात्र शिक्षकांकडे तिरक्या डोळ्यांनी लक्ष ठेवत, एकदम चिडीचूप. पण.. प्रयोग सुरू झाला मात्र, आणि त्यांच्यासमोर आमचे नट दोन कुत्रे बनून आले. भुंकू लागले, तंगडी वर करून शू केल्यासारखं करू लागले, हुंगू लागले, विव्हळू लागले. तेव्हा मुलं उत्तेजित होऊन अक्षरश: उसळू लागली. कुत्र्यांची गंमत पाहून हसता हसता जमिनीवर लोळू लागली. काहींना कुत्र्यांना हात लावून पाहावासा वाटला. प्रयोग संपल्यावर उडय़ा मारत, भुंकून त्यांनी सगळा आसमंत दणाणून टाकला.

प्रयोगानंतर आम्ही आवराआवर करून निघालो. तर.. शाळेचे मुख्याध्यापक समोर हात जोडून उभे. ‘‘तुमचे आभार! खूप आभार. आता हे र्वष संपेपर्यंत मुलं आनंदानं शाळेत येत राहतील.’’ मला भरून आलं; गंमत वाटली; मुलांसाठी आनंद वाटला, शिक्षकांची कीव आली.

तर.. प्रत्येकवेळी काही शिकायला, बोध वगैरे व्हायलाच पाहिजे असंही मुळीच नाही. नाटक केवळ आणि निखळ आनंद निर्माण करू शकतं आणि तोही मुलांना हवाच असतो. त्या मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार आनंदाच्या आणि उत्साहाच्या टॉनिकचा एकच डोस त्यांना वर्षभर पुरणार होता. हा ग्रामीण भागातला अनुभव. पण असाच अनुभव पुणे, बेळगांवसारख्या शहरांमध्येही आला.

लहान मुलांना नाटक पाहताना पाहणं हा एक अप्रतिम अनुभव आहे. त्यांना हा जिवंत अनुभव नाटकातून अनुभवताना पाहणं हा आपल्यासाठी अनुभव असू शकतो. म्हणूनही त्यांची नाटकाशी ओळख करून दिली पाहिजे. ती अत्यंत उत्सुकतेनं, डोळ्यांची पापणीही शक्यतो न हलवता समोर जे घडतंय ते पाहात असतात. मन लावून ऐकत असतात. न लाजता, न घाबरता त्यावर प्रतिक्रिया देत असतात. त्यांची, आम्हाला अमुकच दाखवा, आम्हाला ढमुकच पाहायच आहे. अशा काही हट्टी, आग्रही, एकसुरी अपेक्षाही नसतात. (अर्थात कंटाळा आला, आवडलं नाही तर मात्र तसं बिनधास्त तोंडावर सांगण्याची धमकही असते.) ‘‘मला काहीही समजलेलं नाही आणि मला सगळं समजून घ्यायचं आहे.’’ ही त्यांची मानसिक तयारी असते. अशावेळी नाटकासारख्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कळतनकळत अनेक गोष्टी आणून ठेवता येतात.

मूल जेवत नसलं की आपणही गोष्टी सांगत, त्यातल्या चिऊ -काऊ सारखी अनेक पात्रं प्रत्यक्ष येतील असं मानायला लावत त्याला गुपचूप खाऊ  घालतोच की! आणि त्यालाही आपण घास कधी मटकावले ते कळत नाही. नाटक काहीसं असंच काम करतं.

चिन्मय केळकर

ckelkar@gmail.com